नवम्बर 23, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आपण अधिक चांगल्या नगराकडे पाहतो

डेविड मॅथिस

गेल्या दोन वर्षांत आपल्या अनेक आशांना आव्हान दिले गेले. वारंवार होणारी टाळेबंदी, सामाजिक अस्थिरता, वाढत्या गुन्हेगाऱ्या, न्यायासाठी पुकार या सर्वांमध्ये कोठेतरी जगिक व मानवी उत्तरे मिळावी अशी अपेक्षा होती. पण या जगात मिळणारा न्याय हा वाया गेलेला वेळ आणि त्यापेक्षा गमावलेली जीवने यांची भरपाई करू शकत नाही. लोक ज्या न्यायाची अपेक्षा करतात तो मानवी आहे दैवी नाही.

आपली शहरे ही अशा भग्न लोकांनी भरून गेलेली आहेत. त्यांना खरा उपचार किंवा उभारणी ही ज्यांना ख्रिस्ती आशा आहे अशा लोकांकडूनच मिळेल. इब्री लोकांस पत्रामध्ये ख्रिस्ती आशेची रचना व मानसशास्त्र १०-१२ अध्यायांतून स्पष्ट केले आहे. मोशे, येशू व पहिली मंडळी यांच्यामध्ये आशेने कसे कार्य केले – व आता आपण आपल्या आव्हानांना तोंड देताना, ख्रिस्ती आशा कशी  धरून ठेवू शकतो हे आपण येथे पाहतो.

त्याने संपत्तीपलीकडे पाहिले

जुन्या करारातील सर्वात मोठी निर्गमनाची गोष्ट मोशेपासून सुरू होते. देवाच्या लोकांचा सोडवणारा येऊच नये म्हणून  प्रत्येक जन्मलेला मुलगा मारून टाकावा असा फारोद्वारे सैतानाने आखलेला प्रयत्न देवाने हाणून पाडला. देवाने सुटकेचे साधन मोशे याला प्रथम या कत्तलीपासून वाचवले. त्याला पेटाऱ्यात घातले आणि तो फारोच्या मुलीला मिळाला. आता जो त्याला मारू पाहत होता त्याच्याच घरात तो वाढला. आणि जेव्हा तो प्रौढ झाला तेव्हा या मोशेने एक असामान्य निवड केली. “मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले” (इब्री. ११:२४-२५). हे त्याने विश्वासाने केले. त्यामुळे काय घडले? आपण वाचतो की, “ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती” (इब्री ११:२६).

विश्वास हेच करतो: तो अविश्वासू जगताच्या सध्याच्या संपत्तीकडे पाहतो. आणि नैसर्गिक डोळ्यांना जे दिसते त्याऐवजी तो त्यामधून आणि त्यापलीकडे पाहतो. तो डोळ्यांनी दिसणाऱ्या दुय्यम वास्तवापलीकडे असणारे देवाचे  प्रमुख वास्तव त्याकडे – त्याच्या वचनाकडे आणि त्याने प्रकट केलेले हेतू व अभिवचन यांकडे पाहतो. मोशे शिकला होता की देवाने अब्राहामाला त्याच्या अविश्वासातून  बोलावले, त्याचे राष्ट्र करण्याचे अभिवचन दिले आणि त्याच्या संतानातून सर्पाचे डोके चिरडून टाकणारे भविष्य पूर्ण होणार होते (उत्पत्ती ३:१५). आणि मोशेला त्याच्या हल्ल्यांची जाणीव होती. जसा तो वयात आला तसे त्याला निर्णय घ्यायचा होता. पण तरीही अविश्वासी मिसरातील संपत्ती, सुसंधी, सुखसोयी आणि राजवाड्यातील विलास मोशे कसा नाकारू शकत होता? फक्त “प्रतिफळाकडे दृष्टी लावल्याने.” ही सध्याची जवळची सरणारी संपत्ती नव्हती तर दूरवरची भविष्यातील येणारी कायमची संपत्ती, जी देवाच्या अभिवचनावर आधारित होती. हे जे भविष्याचे परिमाण – विश्वासाचे केवळ आतासाठी नाही तर भविष्यासाठी लागूकरण – यालाच आपण ‘आशा’ असे म्हणतो.

तेव्हा मोशेच्या जीवनाने आशा धरली. त्याने मिसरातील अविश्वास व संपत्तीच्या सभोवतालच्या क्षणिक आनंदापलीकडे पाहिले. आणि त्याने निर्भत्सना, वाईट वागणूक यांचा मार्ग स्वीकारला. ही महान संपत्ती  ख्रिस्तामध्ये येत आहे असे त्याने पहिले.

येणाऱ्या आनंदासाठी त्याने सहन केले

मोशेपेक्षाही मोठा आदर्श संदेष्टा जो त्याच्यानंतर आला आणि त्याच्यापुढे गेला त्याच्यामध्येच मोशेची आशा होती. “कारण ज्या मानाने घर बांधणार्‍याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने हा (येशू) मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे” (इब्री ३:३). मोशे हा सेवक या नात्याने विश्वासू होता; ख्रिस्त हा पुत्र या नात्याने विश्वासू होता (३:५). तर आता पुत्राची आशा आपल्याला काय शिकवते?

इब्री लोकांना लिहिलेल्या परिस्थितीमध्ये लेखक त्यांना टिकून राहायला सांगत आहे. आपण “आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे”(१२:१). त्यांना धीराची गरज होती (१०:३६). टिकून राहणे म्हणजे धावणाऱ्याला काही प्रतिकार होत आहे – आतून किंवा बाहेरून: बाहेरचे अडथळे किंवा आतला थकवा किंवा निराशा. येशू हा कोणत्याही मानवी आदर्शांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण आपण केवळ त्याच्याकडेच पाहत नाही तर तो ज्याकडे पाहत होता ते पाहतो : “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला” (इब्री १२:२).

खुद्द देव मानवी देहात असताना त्याला टिकाव धरण्याची आणि आशेची गरज होती. आणि त्याला ही आशा कोठे मिळाली? सामान्य अडखळणांमध्ये  टिकून राहायला नव्हे तर वधस्तंभामध्ये टिकून राहायला? जो आनंद…काम पूर्ण करण्याचा आनंद, वधू सुरक्षित करण्याचा आनंद आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे पित्याच्या सान्निध्यात जाऊन त्याच्या उजवीकडे बसण्याचा आनंद.

खुद्द ख्रिस्तासाठी आणि आता आपल्यासाठी आशा म्हणजे आपण स्वत: उभारलेली मानवी आशावादी वृत्ती नाही. होकारात्मक विचारप्रवृत्ती नाही. ख्रिस्ती आशा ही दैवी आहे. मोशेप्रमाणे आशा भोवतालची संपत्ती, सध्या मिळणाऱ्या सुखसोयी, विलास यांपलीकडे पाहते आणि येशूप्रमाणे ती हेतूपूर्वक गैरसोयी आणि मृत्यूकडे जाते. हे दु:ख, सहन करण्याची भावना आवडते म्हणून नव्हे तर आपल्याबाहेर असलेल्या आशेने आणि आनंदासाठी सहन केले जाते. ख्रिस्ताच्या सान्निध्यात गेल्यावर आपल्यासाठी जो आनंद वाट  पाहत आहे तो हे सर्व त्रास किती उचित होते हे दाखवून देईल.

त्यांनी काहीतरी अधिक चांगले कवटाळले

शेवटी, पहिल्या ख्रिस्ती मंडळीचे लोक. येशू आणि मोशे हे आदर्श लक्षात घेता ते असामान्य आहेत म्हणून ‘त्यांचे  सोडा हो’ म्हणणे सोपे वाटेल. आपले काय? इब्री लोकांस पत्र ह्या आशेची मनोवृत्ती फक्त मोशे आणि येशूच नव्हे तर पहिल्या मंडळीच्या सामान्य निनावी लोकांमधून पण दाखवते.

सध्याच्या परीक्षेत ख्रिस्ती आशेत टिकून राहा असे सांगताना, लेखक त्यांना ते पूर्वी कसे टिकून राहिले, त्यांना काय आशा होती आणि जेव्हा ते ख्रिस्ताकडे आले तेव्हा त्यांची आशा आणि विश्वास किती जोमाचा होता याची आठवण करून देतो.

“पूर्वीचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली; कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला; तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झालात. कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली” (इब्री १०:३२-३४).

त्यांच्यापैकी काहींना त्यांच्या विश्वासामुळे तुरुंगात टाकले गेले. त्या दिवसांत कैद्यांना जेवण पुरवले जात नसे. त्यामुळे ख्रिस्ती लोकांना पेचात टाकले जात असे. तुरुंगातील आपल्या मित्रांना पुरवठा करण्यास पुढे जाऊन आपण त्यांच्यातले आहोत असे दाखवून छळासाठी स्वत:ला खुले करायचे का? आपण ख्रिस्ती आहोत हे जर त्यांनी उघड केले तर त्यांची जगिक मालमत्ता, व्यवसाय सर्व लुबाडले जाणार होते. पण जगिक वस्तूंपेक्षा त्यांना मोठी आशा होती. म्हणून ते गेले. आणि जसे त्यांना हेरले गेले तसा छळ त्यांनी सहन केला

तरीही आपल्या मालमत्तेची नासधूस त्यांनी आनंदाने सहन केली. कारण त्यांना माहीत होते की त्यांना एक अधिक चांगले व कायमचे ठिकाण आहे. खुद्द ख्रिस्तच त्यांचे पारितोषिक होता.

ह्या सामान्य ख्रिस्ती लोकांचे उदाहरण आपल्याला शिकवते की ख्रिस्ती आशा याचा अर्थ आपले सर्व चांगले, सर्व आनंद, सर्व पारितोषिक केवळ भविष्यात आहे असे नाही. अर्थातच आपण भविष्याकडे पाहतो. पण आता सुद्धा आपल्याला ख्रिस्तामध्येच अधिक चांगली आणि टिकणारी संपत्ती आहे. फक्त असणार असे नाही. आताही तो आपल्याला आहे. भविष्यासाठीची आपली भक्कम आशा ही आता आपल्याला जो आनंद आहे त्याच्याशी घट्ट बांधून ठेवलेली आहे. ख्रिस्तामध्ये आपण त्याचा अनुभव घेत आहोत. आणि मार्गामध्ये सर्व आंतरिक व बाहेरील अडखळणे येत असताना प्रत्येक पायरीवर ख्रिस्त हाच आपल्याला सध्या टिकवून ठेवतो. ख्रिस्ती आशा म्हणजे तो येईपर्यंत आपण मार्गात एकटे रिकामे चालतो असे नाही. आपल्याला आता तो आहे आणि असणार असे त्याचे अभिवचन आहे (मत्तय २८:२०).

येणाऱ्या नगराकडे पाहा

आपल्याला टिकून राहण्याची निश्चितच गरज आहे. आपली जगिक नगरे त्यांची सदोष समता, सदोष न्याय आणि सदोष सुरक्षा यांसह आपले समाधान करतात असे ढोंग आपण करत नाही. आपण “ जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत” (इब्री १३:१४). आपण “अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतो” हे जाणून की खुद्द देव आपल्यासाठी हे नगर तयार करत आहे (इब्री ११:१६).  “पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची” आपण  वाट पाहत आहोत (इब्री ११:१०).

आता आपण “परके व प्रवासी आहोत” हे मान्य करतो. देवाची अभिवचने दुरून पाहून आपण त्याला वंदन करतो (इब्री ११:१३). आपण अजून घरी आलेलो नाहीत. तरीही आपल्याला आशा आहे आणि सध्या आपण तिचा अनुभव घेत आहोत.

आणि त्या आनंदामध्ये आपल्या भग्न, पापी शहरामध्ये जगिक नागरिक म्हणून आपण आपल्याला गुंतवून ठेवू शकतो. तरीही आपण स्वर्गीय नागरिकत्वामध्ये रोवलेले आहोत. त्यासाठी आता लागणारी किंमत द्यायला आपण तयार आहोत कारण आपले पारितोषिक आपली वाट पाहत आहे.

Previous Article

पवित्रतेची सुरुवात येशूच्या जवळीकतेमधून होते

Next Article

याला मी अपवाद आहे असे तुम्हाला वाटते का?

You might be interested in …

यावर विचार करा

अशा प्रकारचे मेसेजेस तुम्हाला नक्कीच मिळाले असतील “हा संदेश १२ लोकांना पाठवा आणि येशू तुमच्यासाठी काय करेल याचा प्रत्यय घ्या…” किंवा “ तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहे . ही साखळी मोडू नका. १० मिनिटात हा […]

जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी पाच प्रार्थना लेखक : स्कॉट हबर्ड

वाट पाहा. यासारखे काही शब्द असतात जे आनंद देणारे नसतात. अगदी थोडे लोक धीराने आशा उंचावतात आणि मग सोडून देतात. “आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते” (नीती १३:१२). जेव्हा एखाद्या मोलवान गोष्टीसाठी आपण खूप […]

भावंडातील वैमनस्य

जॉन पायपर स्टेफनीचा प्रश्न पास्टर जॉन , माझा प्रश्न भावंडातील वैमनस्यासबंधी आहे. उत्पत्तीमध्ये दिसते की प्रत्येक कुटुंबावर  भावंडातील हेव्याचा परिणाम झाला. त्यापैकी काही – काईन आणि हाबेल, याकोब आणि एसाव, राहेल आणि लेआ, योसेफ आणि […]