Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 8, 2022 in जीवन प्रकाश

पवित्रतेची सुरुवात येशूच्या जवळीकतेमधून होते

पवित्रतेची सुरुवात येशूच्या जवळीकतेमधून होते

स्कॉट हबर्ड

पापाशी झगडा करताना, विश्वासासाठी युद्ध करतांना कधीकधी मला वाटते की पवित्रतेचा पाठलाग काही समीकरणानी  मिळाला असता तर!

[क्ष मिनिटांचे बायबल वाचन] + [य मिनिटांची प्रार्थना] x [ आठवड्यातले झ तास] = पवित्रपणा

आणि जर तुम्हाला आणखी पवित्र व्हायचे असेल तर त्यात कोणाशी तरी नियमित जबाबदार असणे, छोट्या अभ्यासगटामध्ये सहभाग, सुवार्ताकार्य, उपवास यांची भर घाला. मग तुम्ही नक्की काही बोलू शकला असता. ह्यामुळे पवित्रता साधण्यासारखी झाली असती. ह्यामुळे आपल्याकडे नियंत्रण आले असते.

मग मला आठवण येते माझ्यासारख्याच एका मनुष्याची जो येशूकडे विचारत आला: “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे” (मार्क १०:१७)? ह्या मनुष्याचे समीकरण जवळजवळ पूर्ण झाले होते: खून नाही, व्यभिचार नाही, चोरी नाही, खोटेपणा नाही (मार्क १०:१९-२०).

यामध्ये कोणता ‘चल’ त्याने गमावला होता? मग जे उत्तर आले त्याने त्याची पवित्रतेचा पाठपुरावा केण्याची सर्व स्वप्ने उधळून लावली: येशूने त्याला म्हणाला, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, [वधस्तंभ घेऊन] माझ्यामागे ये” (मार्क १०:२१).

ये, तुझे हे सर्व अंदाजपत्रक सोडून दे आणि माझ्यामागे ये. माझ्याशी सहवास ठेव. माझा गौरव पाहण्यासाठी जीवन जग.

हे अंदाज करण्यासारखे नाही. ह्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा चालवू शकत नाही. आणि पवित्रतेचा हाच एकमेव मार्ग आहे.

ख्रिस्तविरहित ‘पवित्रता

पवित्रतेसाठी मला ओढ वाटताना एक सामान्य मोह मला होत राहतो: ख्रिस्ती जीवन ख्रिस्ताशिवाय जगणे. शिष्यत्वाऐवजी काही प्रक्रियांचा वापर करायचा, भावनाच्या आवेगाने भक्ती करायची, काटेकोर नियमानुसार सहभागिता. धक्कादायक बाब अशी की यामुळे आपण ख्रिस्ताच्या थोडेही जवळ न जाता ख्रिस्ती जीवनासंबंधी तज्ज्ञ बनतो.  

धार्मिक प्रवृत्तीचे लोक अशा ख्रिस्तविरहित ‘पवित्रते’कडे ओढले जातात. हे आपण परूशी लोकांत पाहतो. ती चालणारी माणसांची थडगी होती. ते  चुना लावलेल्या कबरांसारखे होते; बाहेरून खरोखर सुंदर दिसणारे परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले होते (मत्तय २३:२७).  कलसै येथील खोट्या संदेष्ट्यामध्ये आपण ते पाहतो. ते स्वत: योजलेला धर्म पाळत असताना, लीनता व देहदंडन करीत असताना, मेजवान्या झोडत असत (कलसै २:२३). आणि आपल्यातले अनेक जण ह्याचे अंश आपल्यामध्ये पाहतो

ख्रिस्तरहित पवित्रता प्राप्त करण्याची माझी ओढ नुकतीच उघड झाली. त्यावेळी एका भक्त मला मार्गदर्शन करत असताना मी स्वत:ला विचारत होतो “ख्रिस्ती जीवन आणि पवित्रता’ यावर तू किती पुस्तके वाचली आहेस? आणि मनातल्या मनात मोजत असताना मी विचारले “खुद्द येशूबद्दल किती पुस्तके वाचली आहेत?’ अशा तुलनेने प्रश्न उभा राहतो की “ख्रिस्ती जीवनाच्या सरावाकडे आपण जास्त आकृष्ट होतो की ख्रिस्त या व्यक्तीकडे?

स्वत: पवित्रता संपादन करण्यातली व्यर्थता

केवळ शिस्त आणि तंत्रे यावर अवलंबून असलेली पवित्रता ही पवित्रता नाहीच- जरी बाहेरून ती कितीही चकचकीत दिसत असेल. याला योग्य नाव म्हणजे स्व-धार्मिकता आणि ही व्यर्थ आणि हताश करणारी आहे.

बहुतेक वेळा स्वत: पवित्रता संपादन करणारे त्याच त्याच खड्डयात पुन्हा पडत राहतात. ते द्राक्षवेलाशिवाय असलेल्या फांदीप्रमाणे सामर्थ्यहीन आहेत (योहान १५:४-५). दुसरा नेत्रकटाक्ष, तिसरी घटना किंवा चवथा पेग याचा मोह ते टाळू शकत नाहीत. त्यांना पक्षघात झालेला असूनही ते स्वत:ला चालायला लावतात. आपल्यातील कित्येक जण पुन्हा पुन्हा झालेल्या पतनाच्या वेदना आणि त्यामुळे झालेल्या जखमा अजूनही अनुभवत आहोत.
खरंतर स्वधार्मिकतेमध्ये पतन होण्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे तिच्यात यशस्वी होणे.

पौल अशा स्वत: पवित्रता कमावणाऱ्या ‘यशस्वी’ लोकांचे एक स्पष्ट चित्र कलसै २:१६-२३ मध्ये रंगवतो. कणखर इच्छेने ते स्वत:पुढे त्यांच्या नियमांची यादी समोर ठेवतात. “हाती धरू नको, चाखू नको; स्पर्श करू नको”  (कलसै २:२१). ते त्यांच्या वासना काबूत ठेवण्यासाठी त्यांच्या शरीराला कठोरपणे फटके मारतात (कलसै २:२३). ते धार्मिक व गूढ वाटतात, देवदूतांबद्दल बोलतात व त्यांच्या दृष्टांताबद्दल सविस्तर सांगत राहतात (२:१८).

पण नंतर त्याचे विनाशकारी मूल्यमापन येते. त्यांची सर्व शिस्त व आत्मसंयमन यांची “देहस्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची योग्यता नाही” (कलसै २:२३). स्वत: पवित्रता संपादन करणे म्हणजे फक्त बाहेरच्या पापांची आंतरिक पापांशी अदलाबदल करणे : अश्लील फितीची गर्वाशी, खादाडपणाची लोभाशी, क्रोधाविष्टपणाची शांतपणे तिरस्कार करण्याशी.

आणि का? कारण त्यांच्या या नैतिक शुद्धतेच्या उत्साहात स्वधार्मिकता संपादन करणारे हे लोक जो ‘मस्तक’ त्याला धरून राहत नाहीत – म्हणजे ते येशूवर भरवसा ठेवायला व त्याच्यावर प्रेम करायला नकार देतात (कलसै २:१९). बाहेरच्या सद्गुणांचा मेकअप खरी कुरूपता लपवून ठेवतो: स्वत:ची पवित्रता कमावू पाहणारे लोक तोडून टाकलेल्या हातासारखे जीवनरहित असतात.

पवित्रता उलगडली

जेव्हा आपण पवित्रता ख्रिस्तापासून वेगळी करतो तेव्हा तिचा पाठपुरावा हा वैयक्तिक व तांत्रिक बनला जातो – मग ते आध्यात्मिक समीकरण सोडवणे किंवा माझ्या कणखर इच्छेचा परिणाम असे होते. पण ख्रिस्ती पवित्रता ही तांत्रिक किंवा वैयक्तिक नाही: प्रथमत: ती नातेसंबंधात होते.

आणि म्हणून जेव्हा पौल कलसै २ मधून कलसै ३ मध्ये येतो तेव्हा तो आपली दृष्टी स्वधार्मिकता संपादन करण्याच्या व्यर्थतेपासून पवित्रीकरण होण्याकडे वळवतो.

“म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा… कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे” (कलसै ३:१,३).  तुमचे जीवन – तुमचे खरे जीवन – ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. ही एकता तुम्हाला पवित्र करते (कलसै ३:१२). पण ती पवित्रता इथे जगण्यासाठी ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करायला पाहिजे (३:१). दुसऱ्या शब्दात पवित्रता हे आपल्या ख्रिस्ताशी झालेल्या ऐक्याचे फूल आहे आणि ते आपल्या ख्रिस्ताशी होत असलेल्या सहभागितेमध्ये उमलत जाते.

नंतर आणि नंतरच पौल कलसैकरांना आज्ञा देतो की अमुक अमुक पापांना जिवे मारा (कलसै ३: ५-११). त्यामध्ये तो असे सुचवतो की जे लोक येशूला धरून आहेत तेच खऱ्या रीतीने पापाला जिवे मारू शकतात. आपण कुष्टरोगी आहोत आणि जसा तो त्याचा हात आपल्यावर ठेवतो तसे आपण शुद्ध होतो. आपण पक्षघात झालेले आहोत तो आज्ञा देतो आणि आपण उठतो, आपण आंधळे आहोत आणि जसा तो आपल्या डोळ्यांना स्पर्श करतो तसे आपल्याला दिसू लागते.

जे आय पॅकर निष्कर्ष काढतात: “पवित्रपणाची आस्था असलेले लोक अधिक पवित्र असतात असे नाही तर ज्यांची मने आणि ह्रदये, ध्येये आणि हेतू प्रीती आणि आशा हे सर्व प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्णपणे केंद्रित असते तेच पवित्र असतात

‘भेटीचे समय’

तर मग आपण आपल्याला ख्रिस्तापासून दूर ठेवून पवित्रतेच्या मागे न लागण्यापासून कसे सांभाळतो? शेवटी आपल्याला पवित्र आत्म्याची नितांत गरज आहे. तो आपल्यामध्ये राहतो यासाठी की दररोज त्याने आपल्याला ख्रिस्ताकडे ओढून घ्यावे (योहान १६:१४). त्याने शेवटपर्यंत हे कार्य आपल्यामध्ये करावे म्हणून हा विचार करा: जेव्हा तुम्ही बायबल  वाचायला, प्रार्थना करायला किंवा देवाचे वचन ऐकायला बसता तेव्हा ख्रिस्ताशी सहभागिता हे एकच तुमचे ध्येय असू  द्या.

यामध्ये रॉबर्ट मक्चेन आपल्याला मदत करतात. शास्त्रवाचन, प्रार्थना, संदेश यांना ते आध्यात्मिक शिस्तीचे समय न म्हणता ते त्यांना ‘भेटीचे समय’ म्हणतात. ते म्हणतात:

दैनंदिन बायबल वाचनामध्ये ख्रिस्त दररोज आपल्या जिवाची भेट घेतो. दररोजच्या प्रार्थनेमध्ये ख्रिस्त त्याच्या प्रियजनांना स्वत:चे प्रकटीकरण अशा प्रकारे करतो की जे तो जगाला करत नाही. देवाच्या घरात ख्रिस्त आपल्या लोकांकडे येतो आणि म्हणतो: “तुम्हाला शांती असो.” आणि प्रभूभोजनामध्ये भाकर मोडण्यामध्ये तो स्वत:ला दाखवतो आणि मग ते ओरडतात: “ प्रभू आहे!” हे भेटीचे समय आहेत जेव्हा तारणारा स्वत: आपल्या लोकांची भेट घेण्यास येतो.

इथे कोणतेही समीकरण नाही. फक्त काहीतरी अधिक चांगले: एक तारणारा जो आपल्याला भेट देण्यास, आपल्याशी सहभागिता ठेवण्यास आणि त्याचा गौरव दाखवण्यास नेहमीच तयार असतो. आणि असे करताना जसा तो पवित्र आहे तसे आपल्यालाही पवित्र करण्यासाठी.