नवम्बर 24, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक १०


५ वा दाविदाचा करार

हा  विनाअटींचा करार आहे. दावीद देवाच्या निवासाप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याच्या विचारात असताना, दावीद युद्धप्रिय असून त्याच्या हातून अत्यंत रक्तपात झाल्याने मंदिर बांधण्यास देव त्याला मना करतो. पण दाविदाचे घराणे युगानुयुग राजासनावर बसेल असा करार करून अभिवचन देतो. याविषयीच्या अनेक शास्त्रपाठांपैकी
२ शमुवेल ७:१२-१६ ही वचने या कराराचा गाभा आहेत. त्यात म्हटले आहे की दाविदाचे नाव महान होईल. इस्राएलांस देव एक वसतिस्थान देईल. शत्रूंपासून त्यांना अढळ विसावा देईल. दाविदाचे घराणे देव कायमचे स्थापील. त्याचे राज्य व घराणे निरंतर व युगानुयुग राहील. शलमोन मंदिर बांधील. देव शलमोनाचा पिता होईल. त्याच्याकडून अवज्ञा झाली तर देव त्याला शासन करील, पण देव त्याच्या हातून राज्य काढून घेणार नाही. वचने १४-१५.  मग वचन १८-२९ मध्ये दावीद कृतज्ञतेने देवाला प्रार्थना सादर करतो. हा करार मानवाला व्यावहारिक बोध करणारा आहे. तो मूळ भाषेत ‘तू मानवजातीला नियम देऊन ठेवले आहेत’ असे सूचित करतो. म्हणजे दाविदाशी केलेला करार विदेश्यांसाही गोवून घेऊन त्यांच्यावर प्रभाव पाडणारा आहे. तो अब्राहामाशी केलेल्या कराराची पुनरावृत्ती करणारा दिसतो. उत्पत्ती १२:३; २२:१८. दाविदाचा करार भावी काळावर प्रकाश टाकतो. आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्यामधून हा राजकीय वंश पुढे सरकत असल्याचे स्पष्ट करतो.

२ शमुवेल मध्ये करार हा शब्द वापरलेला नाही. पण स्तोत्र ८९: ३-४ मध्ये वापरला आहे. त्यात “ मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे. मी आपला सेवक दावीद याच्याशी शपथ वाहिली आहे. मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापीन.” असे म्हटले आहे.

पुढे आपण पहातो की नव्या कराराचे युग सुरू होताच येशू हा दाविदाचे अखेरचे संतान म्हणून प्रकट होतो. मत्तय १:१ ची सुरुवातच अशी आहे की, ‘अब्राहामाचा पुत्र, दाविदाचा पुत्र जो येशूख्रिस्त, त्याची वंशावळी.’
येशूला या जगातील संपूर्ण सेवाकालात दाविदाचा पुत्र असे संबोधले आहे. मत्तय ९:२७ ; १५:२२; २१:१५. दाविदाला दिलेल्या संतांनाविषयीच्या अभिवचनाच्या परिपूर्तीप्रमाणेच येशू जगात आला, वधस्तंभी गेला व पुनरुत्थित झाला; हे त्याच्या राज्याच्या बांधणीसाठीच झाले असा पहिल्या मंडळीचा ठाम विश्वास होता.
प्रे.कृ २:३०-३६; १३:३४-३७. शिवाय प्रकटी ३:७ मध्ये येशूच्या हाती दाविदाची किल्ली आहे, असे म्हटले आहे, तर २२:१६ मध्ये येशूला दाविदाचा अंकुर व संतान असे संबोधले आहे. आपण स्पष्ट पहातो की दाविदाच्या करारातील येशूच्या पहिल्या आगमनाची भाकिते पूर्ण झाली आहेत. तर दुसर्‍या आगमनाची भाकिते पूर्ण व्हायची आहेत. पहिल्या आगमनात तो दाविदाच्या घराण्यातील राजा म्हणून प्रकट झाला. त्याच्या या आगमनातील कार्यामुळे त्याच्यावरील विश्वासाने त्याच्या राज्याची प्रजा प्रत्येक विश्वासी व्यक्ती बनू शकते. कलसै १:१३. मशीहावरील विश्वासाने आपले तारण होणे हा देखील दाविदाच्या कराराचाच एक भाग आहे. प्रे.कृ १५ :१४-१८. पण दाविदाचे राज्य व त्याचे राजासन हा येशूच्या द्वितीयागमनाचा भाग आहे. मत्तय २५:३१. तेव्हा पृथ्वीचे नवीकरण होईल व येशू आणि त्याचे शिष्य पुनरुज्जीवन झालेल्या एकसंघ इस्राएलांवर राज्य करतील.

नवा करार

अब्राहामाच्या करारानुसार त्याच्या संतानाचे एक राष्ट्र उदयास येईल. ते इतर राष्ट्रांना आशीर्वाद होईल, असे तो करार सांगतो. तर दाविदाचा करार दाविदाचा राजवंश इस्राएलांवर राज्य करील व अखेर जगावर राज्य करील असे अभिवचन देतो. जखऱ्या १४:९;  मत्तय २५:३१-३४. पण अजूनही माणसांची त्या राज्यासाठी अंत:करणे बदलणे आवश्यक आहे. त्या राज्याची प्रजा देवाची अवज्ञा करणारी व प्रीतिहीन असेल तर काय फायदा? त्यासाठीच नवा करार महत्त्वाचा आहे. हा करारही विनाअट व सार्वकालिक आहे. देवच आपल्या लोकांना स्वेच्छेने त्याची सेवा करायला व त्याच्या आशीर्वादात राहायला सामर्थ्य देतो. हा करार यिर्मया ३१:३१-३४ मध्ये दिला आहे. या कराराची पार्श्वभूमी अशी आहे की यहुदाने मोशेचा करार मोडून देवाविरुद्ध बंड केले आहे. म्हणून यिर्मया त्यांना देवाकडून येणार्‍या न्यायाचा इशारा देत आहे. हा नवा करार प्राप्त करणारे इस्राएल लोक आहेत. तरीही त्याची व्याप्ती विदेश्यांपर्यंत  नेली आहे. उत्पत्ती १२:३; २ शमुवेल ७: १९; यशया ५२:१५.  त्यामुळे देवाने या करारांच्या योजनेत इस्राएलांप्रमाणेच विदेश्यांनाही आशीर्वादित करून समाविष्ट केले असल्याचे स्पष्ट दिसते. नवा करार मोशेच्या कराराप्रमाणे नाही. मोशेचा करार अटीसह होता व अवज्ञा केल्यास रद्द होणारा होता. तो इस्राएलांनी  जरी मोडला तरी देवाने तो मोडला नव्हता. देव आपल्या कराराशी विश्वासू होता. नव्या कराराचे मर्म हे होते की देव त्याचे नियम लोकांच्या अंत:करणात लिहिणार होता. यिर्मया ३१:३३. त्यांनी देवाचे नियम पाळले तर ते देवाची प्रजा बनणार होते. त्यात प्रत्यक्ष धाक, शिक्षा नव्हती. आज्ञापालन आध्यात्मिक होते म्हणजे देवाला ओळखून ते मनापासून करायचे होते.

नवे हृदय हे नव्या कराराचे केंद्र होय. मोशेचा करार पवित्र, न्याय्य  व चांगला होता. रोम ७:१२. पण आज्ञापालनास समर्थ करणारा नव्हता. तर नवा करार देवाची प्रेमाने सेवा करण्यास समर्थ करणारा होता. यहेज्केल ३६:२६-२७ नुसार कराराचा एक भाग म्हणून पवित्र आत्माच लोकांच्या अंत:करणात वसणार होता. त्याचे हे मुक्तिचे कार्य इ.स.३० मध्ये सुरू झाले. वरील वचनांनुसार देव लोकांमध्ये पवित्र आत्मा घालणार होता. त्याचे नियम पाळून त्यानुसार आचरण करायला त्यांना समर्थ करणार होता. पुष्कळशी वचने या नव्या कराराविषयी शिकवण देतात. अनुवाद ३०:१-६ नुसार देव इस्राएलांचा उद्धार करून त्यांना आज्ञापालन करणारे नवीन ह्रदय देणार होता. नंतर त्यांची भरभराट करणार होता. यहेज्केल १६:५३-६३ व ३७:२१-२८ मध्ये देवाची त्यांच्या उद्धाराविषयीची योजना आपण वाचतो. यशया ३२:१ व १५-२० मध्ये त्यासाठी देव त्यांच्यावर आत्म्याचा वर्षाव करण्याविषयी आणि त्यानंतर शांतीचे राज्य स्थापण्याविषयी बोलतो. या प्रकारे मागील करारांशी नवा करार निगडित असल्याचे देव स्पष्ट करतो. तर यशया ५९:२०-२१; रोम ११:२६-२७ मध्ये इस्राएलांच्या तारणाविषयीची योजना स्पष्ट करतो. अशी अनेक वचने आत्मिक व भौतिक आशीर्वादांविषयी, क्षमेविषयी, राष्ट्राच्या  पुनर्बांधणीविषयी आहेत. ‘मी – करीन’ हे देवाचे बोल हा करार विनाअट व खात्रीशीर असल्याचे सूचित करतो.

या नव्या कराराचा व त्यातील आशीर्वादांचा मध्यस्थ दाविदाचा पुत्र येशू आहे. तोच प्रत्येक विश्वासीयाचा पवित्र आत्म्याने व अग्निने बाप्तिस्मा करणारा आहे. येशूने आपल्या मरणाची नव्या कराराशी सांगड घातली आहे. लूक २२:२०; १करिंथ ११:२५. आणि त्याचा स्मरणार्थ चिन्ह म्हणून प्रभुभोजनाचा विधी लावून देताना म्हटले, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, जितकेदा तुम्ही हे पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ तुम्ही  हे करा.” येशूने त्याच्या मरणाद्वारे नव्या कराराची स्थापना केली. आणि आपल्यासाठी तो दु:ख व क्लेश सहन करणारा सेवक आहे अशी स्वत:ची ओळख करून दिली. यशया ५३:३-६. सध्याच्या मंडळीच्या युगावर नव्या कराराचा आज मोठा प्रभाव आहे. येशूला तारणारा व मशीहा म्हणून स्वीकारणार्‍यांच्या ठायी पवित्र आत्मा वस्ती करायला येतो. आणि त्यांना नव्या करारातील सर्व आशीर्वादाचे विभागी करून घेतो.  इब्री ८:८-१३ ; ९:१५ ;१२:२४. अजूनही नव्या करारातील इस्राएलांविषयीची व मंडळीविषयीची राष्ट्रीय व भौतिक अभिवचने प्रत्यक्षात पूर्ण व्हायची  आहेत. इस्राएल राष्ट्राचे तारण व्हायचे आहे. जुन्या करारात केलेल्या नव्या कराराची येशूच्या पहिल्या आगमनाने काही पूर्तता झाली.  व भावी काळी व ख्रिस्ताच्या दुसर्‍या आगमनाने उरलेल्या भाकितांची पूर्तता होणार आहे. आतापर्यंतची जी सर्व अभिवचन पूर्ण झाली ती दाखवतात की उरलेली करारातील सर्व वचने पूर्ण होणारच. आमेन.                     

                                               प्रश्नावली


प्रश्न १ ला- विवेचनाचा आधार घेऊन पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
                                                                   

१- देवाने दाविदाला मंदिर बांधण्यास का मनाई केली?                                                    
२- दाविदाच्या कराराचे मुख्य मुद्दे कोणते?                            
3- दाविदाशी करार होताच त्याने २ शमुवेल ७:१८-२९ वचनांमध्ये मध्ये काय केले?                                         
४- दाविदाचा करार कोणाला गोवून घेणारा होता?                                                     
५- येशूला दाविदाचा पुत्र असे का संबोधले गेले?                                                                     
६- पहिल्या मंडळीचा काय ठाम विश्वास होता?                                                              
७- येशूच्या पहिल्या आगमनातील कार्यामुळे काय काम होते?                                                            
८- अब्राहामाचा करार काय सांगतो? दाविदाचा करार काय सांगतो?                                                      
९- देवाच्या राज्यासाठी माणसामध्ये काय घडणे आवश्यक आहे?                                                  
१०- यिर्मयाचा करार यहुदाला काय इशारा देत आहे?                                                                          
११- यिर्मयाचा नवा करार प्रथम कोणाला प्राप्त झाला? तरी त्याची व्याप्ती कोठवर आहे?                                
१२- मोशेचा करार कसा होता? तरी त्यात कोणती उणीव होती?                                                           
१३- नव्या कराराचे मर्म काय? नव्या कराराचे केंद्र काय?                                                                                      
१४- मुक्तिचे कार्य केव्हा सुरू झाले?                 
१५- देव पवित्र आत्म्याद्वारे लोकांना कशासाठी तयार करणार होता?                                    
१६- पवित्र आत्मा आता कोठे वसतो?                                                                                      
१७- पुढे एकसंघ इस्राएलावर कोण राज्य करणार?                                                             

प्रश्न २ रा- पुढील वर्णनांपुढे कंसातील योग्य संदर्भ लिहा.
( अनुवाद ३०:१-६; रोम११:२६; यहेज्केल १६:५३-६३; यशया ३२:१ व १५-२०; स्तोत्र ८९:३-४ )                                      

१- इस्राएलावर आत्म्याचा वर्षाव व शांतीचे राज्य ——-
२- देवाने निवडलेल्या पुरुषाशी करार—-           
३- इस्राएलांना नवे ह्रदय देवून उद्धार व भरभराटीचे भाकीत —-
४- इस्राएलांच्या उद्धाराची योजना—                       
५- इस्रायएलांच्या तारणाची योजना स्पष्ट ——                                                             

प्रश्न ३ रा- गट (|) मधील वाक्यांशाचा क्रमांक गट (||) मधील योग्य वाक्यांशापुढे लिहा.                           

गट (|). १- दाविदाचा करार, २- ‘ मी करीन’ ३- करार झाल्यावर, ४- येशू पवित्र आत्म्याने व,     ५- तू मानवजातीला नियम देवून ठेवले, ६- अब्राहाम इसहाक व याकोब, ७- नव्या कराराच्या आशिर्वादाचा , ८- नव्या कराराच्या स्मरणाचे चिन्ह, ९- येशू, १०, येशूच्या हाती, ११- दाविदाचे राज्य व राजासन, १२- दाविदाच्या घराण्यातील राजा प्रगट,                                                   

गट (||). क- दाविदाची किल्ली —- ख- येशूच्या पहिल्या आगमनाचा भाग, —- ग विदेश्यांना गोवून घेण्याची खात्री,—-
घ- अब्राहामाच्या कराराची पुनरावृत्ती—– च- दाविदाची कृतज्ञतेने प्रार्थना सादर—- छ- दाविदाचे अखेरचे संतान, अंकुर—— ज- येशूच्या द्वितीय आगमनाचा भाग —– झ- इस्राएल राजावंशाची अशी वाटचाल—  त- व अग्निने बाप्तिस्मा करणारा —-  थ- प्रभूभोजनाचा विधी—- द- मध्यस्थ येशू—-
ध- अटीविना कराराची खात्री देणारे बोल —-                                                        

प्रश्न ४ था – चूक की बरोबर सांगून चुकीची विधाने दुरुस्त करा.                                                                 

१- येशूच्या पहिल्या आगमनाची भाकिते पूर्ण झाली, दुसर्‍या आगमनाचीही होणार—–                         
२- देवाच्या राज्यात अवज्ञा करणारी व प्रीतिहीन प्रजा प्रवेश करील——                                        
३- मोशेचा करार मोडला म्हणून काही बिघडणार नव्हते——                                                                     
४- देवाने मोशेचा करार मोडला पण इस्राएलांनी पाळला—–                                                              
५- मोशेचा करार पवित्र, चांगला होता पण आज्ञापालनास सामर्थ्य करणारा नव्हता—–  

Previous Article

मोठी मिळकत मिळावी म्हणून प्रार्थना करणे चुकीचे आहे का?

Next Article

ख्रिस्त तुमचा प्रभू आहे का?

You might be interested in …

कोमट कसे राहू नये

लेखक: ग्रेग मोर्स अनेक वर्षे मी समजत होतो की मी ख्रिस्ती आहे -पण मी नव्हतो. माझे आणि देवाचे नाते आहे हे मी शपथेवर सांगे- पण तसे नव्हते. मी कोणत्याही क्षणी मेलो तरी स्वर्गात माझे स्वागत होईल […]

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर अनुवाद : क्रॉसी उर्टेकर एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन […]

लेखांक ३: जेव्हा देव अन्यायी वाटतो

जॉनी एरिक्सन टाडा (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जोनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी  कौशल्ये व अशा स्थितीमध्ये असलेल्यांना मदत […]