अप्रैल 21, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

अपत्यहीन लोकांसाठी

जॉन पायपर

तुमच्या आणि तुमच्या आयुष्याबद्दल मला माहीत नाही, पण सध्या माझ्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी आहेत जी गर्भपात किंवा वंध्यत्वामुळे संघर्ष करत आहेत. हे मी यापूर्वी कधी पाहिले नव्हते. हे एक मोठे ओझे आहे. आणि तरीही, अशा दुःखी जोडप्यांसाठी आपल्याला पवित्र शास्त्रात आशा सापडते, विशेषतः, यशया ५६:४-५  मध्ये.

प्रश्न

“पास्टर जॉन, विशेषतः ज्या जोडप्यांना मुले होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी आजच्या वंध्यत्व आणि अपत्यहीनतेच्या संघर्षाच्या प्रकाशात आपण यशया ५६:४-५ मध्ये षंढांसाठी दिलेल्या या अभिवचनाचा अर्थ कसा लावावा? देव त्यांना मुलगे आणि मुलींपेक्षा एक उत्तम नाव देईल ही देवाची घोषणा, ज्यांना मुलांची ओढ आहे पण गर्भधारणा करू शकत नाहीत, त्यांना हे वचन काय सांगते?  हा परिच्छेद कुटुंब आणि वारसा याबद्दल देवाच्या दृष्टिकोनाबद्दल काय प्रकट करतो?

“तसेच आपण देवाचा विश्वासूपणा आणि तरतूद समजून घेण्यासाठी या वचनांचा व्यावहारिक उपयोग कसा करू शकतो? हा परिच्छेद असे सूचित करतो का की देवाच्या राज्यातील फलदायी जीवन आपल्या संस्कृतीतील मुलांच्या  अपेक्षेपेक्षा खूप वेगळे असू शकते? आणि जे मुले न झाल्यामुळे दुःखी आहेत त्यांना आपण कसे प्रोत्साहन देऊ शकतो?

उत्तर

सर्वज्ञ, सर्व-उत्तम, सर्वशक्तिमान सृष्टिकर्ता तुम्हाला वैयक्तिकरित्या जे म्हणतो ते ऐकणे ही एक अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे: “जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही” (स्तोत्र ८४:११). किंवा “खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील” (स्तोत्र २३:६). किंवा मी तुझ्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती तुझ्या भल्यासाठी घडवून आणतो (रोम. ८:२८ पहा). आणि त्याच वेळी त्याने असेही म्हटले आहे हे आपल्याला ठाऊक असावे, “मी तुला अनेक भारी संकटे भोगायला लावली ” (स्तोत्र ७१:२०).

देवाला असे म्हणताना ऐकणे आणि ते आपल्या आत्म्याच्या खोलवर जाणणे, ही एक मौल्यवान गोष्ट आहे, “माझ्या मुला,  मी चांगला आहे; मी ज्ञानी आहे; मी सामर्थ्यवान आहे., मी तुझ्या भल्यासाठी योजलेले नाही असे काहीच तुला घडणार नाही.” हे देवाकडून आलेले एक मौल्यवान वचन आहे, परंतु जेव्हा देव आपल्या जीवनात आलेल्या एखाद्या विशिष्ट, असामान्य संकटाची किंवा आपत्तीची निवड करतो आणि मग त्या संकटाच्या संदर्भात हेच सत्य आपल्याला पुन्हा विशेषपणे सांगतो, तेव्हा ते वचन आणखीनच मौल्यवान ठरते. आता वंध्यत्वाचा अनुभव घेत असलेल्या आपल्या एका बहिणीने  देवाच्या अशाच एका मौल्यवान, विशिष्ट शब्दाकडे आमचे लक्ष वेधले आहे —निःसंतान असण्याच्या  एका वचनाकडे.

मौल्यवान, विशिष्ट वचन

तर, यशया ५६:३-५ या समस्येबद्दल विशेषपणे — केवळ सामान्यपणे नाही, तर विशेषपणे — काय म्हणतो ते येथे दिले आहे:

षंढही न म्हणो की, “मी केवळ शुष्क वृक्ष आहे.” कारण परमेश्वर म्हणतो, “जे षंढ माझे शब्बाथ पाळतात, मला आवडणार्‍या गोष्टी पसंत करतात व माझ्या करारास दृढ धरून राहतात, त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.”

आता या मजकुरातील षंढ ” या शब्दाचा स्पष्ट अर्थ म्हणजे जो पुरुष मुलांना जन्म देऊ शकत नाही. त्याला नपुंसक बनण्यास जबरदस्ती केली गेली असेल, किंवा मुलांना जन्म न देऊ शकण्यामागे काही नैसर्गिक किंवा अपघाती कारण असू शकेल. कोणत्याही परिस्थितीत मुद्दा हा आहे: जुन्या करारातील नियमानुसार षंढ असण्याशी संबंधित दोन वेदनादायक परिणाम होते. एक म्हणजे त्याला परमेश्वराच्या सभेतून, परमेश्वराच्या घरातून वगळण्यात आले होते (अनुवाद २३:१). दुसरे म्हणजे, तो आपले नाव पुढे चालू ठेवण्यासाठी संतती निर्माण करू शकत नव्हता. ही गोष्ट दुहेरी निराशाजनक होती. तो देव आणि त्याच्या लोकांशी असलेल्या सहभागितेपासून वंचित झाला होता, आणि त्याचा मानवांमधील  वारसा भविष्यातून कापला गेला होता.

मला वाटते की, आपल्या काळात जे पुरुष आणि स्त्रिया वंध्य आहेत आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना हा मजकूर लागू करणे योग्य आहे. ख्रिस्तामध्ये देवाच्या सर्व अभिवचनांना ‘हो’ आहे (२ करिंथ. १:२०:) असे म्हणणे योग्य आहे —केवळ ख्रिस्तामध्ये असलेल्यांसाठीच ती ‘हो’ नाहीत, तर जुन्या करारात वचन दिलेले आशीर्वाद ख्रिस्तामध्ये अद्भुतपणे ओलांडले गेले आहेत.

यापेक्षाही अधिक चांगले आहे. कारण जुन्या करारातील संदेष्ट्यांना अजून ख्रिस्त माहीत नव्हता; ते त्याला ओळखत नव्हते. त्यांना मशीहा, देवाचा पुत्र माहीत नव्हता. पण आता ख्रिस्तासोबतची आमची सहभागिता प्रत्येक अभिवचन पूर्ण करते, त्यामुळे प्रत्येक अभिवचनाला एक चालना मिळते. त्याला महत्त्वाची प्रचंड वाढ मिळते, कारण ती सर्व आपल्यासाठी येशूने विकत घेतली आहेत.  त्या सर्वांसोबत येशू असतो, आणि प्रत्येक अभिवचनाच्या प्रत्येक पूर्ततेमध्ये आपण त्याच्यासोबत सहभागितेचा आनंद घेतो.

निःसंतान लोकांसाठी तीन भेटवस्तू

तर होय, ही वचने एक भेट आहे; जे मुलांना जन्म देऊ शकत नाहीत  त्या ख्रिस्ती स्त्री किंवा पुरुषासाठी एक अभिवचन आहे. ज्यांना या दुःखासोबत आणि निराशेसोबत जगावे लागते, त्यांच्यासाठी या वचनांचे किमान तीन अर्थ आहेत.

१. देवाच्या घरात

वचन ५ मध्ये म्हटले आहे, विश्वास ठेवणाऱ्या नपुंसकांना, निःसंतान लोकांना  “माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन.” आणि “माझ्या घरात” आणि “माझ्या भिंतींच्या आत” हे महत्त्वाचे असण्याचे कारण म्हणजे जुन्या करारातील देवाच्या घरातून होणारा बहिष्कार. आणि येथे नियमशास्त्राने तात्पुरत्या स्वरूपात जे सांगितले होते, त्याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. “तुम्हाला कुटुंबातून, देवाच्या घरातून, जिवंत देवाच्या सान्निध्यातून बहिष्कृत केले जाणार नाही.”

आणि नवीन करार हे वचन एका अफाट उंचीवर नेतो, जेव्हा तो म्हणतो की आपण केवळ देवाच्या घरातच नाही, तर आपण देवाचे घर, देवाचे कुटुंब आहोत. आपण देवाच्या घरात देवाची मुले आहोत. दुसऱ्या शब्दांत, बायबल आपल्याला आठवण करून देते की मुलांना जन्म देऊ न शकणे किंवा त्यांचे पालक न होऊ शकणे ही शिक्षा किंवा शाप नाही, कारण ख्रिस्ताने आपली शिक्षा, आपला शाप स्वतःवर घेतला आहे, तो आपला शाप बनला आहे. उलट, देव म्हणतो, “तुम्ही केवळ शापित नाही असेच नाही तर तुम्हाला दत्तक घेतले आहे; तुम्ही भिंतींच्या आत आहात; तुम्ही घरात आहात; तुम्ही कुटुंबात आहात. माझ्या निःसंतान मुलांपासून मला कोणीही वेगळे करू शकत नाही.” हा पहिला मुद्दा.


२. देवाचे नाव धारण करणे

वचन ५ म्हणते, “कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.”  हे खरे असू शकते की तुमचे आडनाव पृथ्वीवर पुढे चालवले जाणार नाही. अशा प्रकारचा वारसा तुमच्यापासून वंचित ठेवला जाऊ शकतो. पण प्रकटीकरण ३:१२ म्हणते की देव तुम्हाला स्वतःचे नाव देईल. ते तुम्हाला माहीत असलेल्या इतर कोणत्याही नावापेक्षा, पृथ्वीवरील कोणत्याही नावापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ असणार.

येशू म्हणाला की स्वर्गात विवाह होणार नाही किंवा विवाह करून दिला जाणार नाही (मत्तय २२:३०). आणि मला वाटते याचा अर्थ असा आहे की तेथे पालकत्व नसेल आणि वंशपरंपरेच्या वारशांची तुलना केली जाणार नाही. एकच महान वारसा असेल, एकच महान नाव असेल: देवाचे नाव, येशूचे नाव. आपण त्याची मुले असू आणि त्याचे नाव धारण करू — आणि त्याचे नाव, आपला दत्तकपणा आणि आपला वारसा हे पुत्र आणि कन्यांपेक्षाही एक उत्तम स्मारक असेल, अनंत पटीने उत्तम.

३. परमेश्वराने लावलेले रोप

शेवटी, वचन ३ म्हणते, “नपुंसकाने असे म्हणू नये की, ‘मी केवळ शुष्क वृक्ष आहे…” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, हा परिच्छेद केवळ या वास्तवाशी संबंधित नाही की ख्रिस्तामध्ये विश्वासीयांना पुत्र आणि कन्यांपेक्षा एक चांगले नाव आणि चांगला वारसा आहे. हा परिच्छेद या संदर्भात आपल्याला स्वतःबद्दल कसे वाटते, आपण स्वतःबद्दल कसे बोलतो, याच्याशी देखील संबंधित आहे. निपुत्रिक विश्वासीयांनी असे म्हणू नये की, “मी केवळ शुष्क वृक्ष आहे.” का? कारण तुम्ही तसे नाही; तुम्ही सुके झाड नाही. तुम्ही एक हिरवेगार झाड आहात, एक फलदायी झाड आहात.

तुम्हाला माहीत आहे का की स्तोत्र १ मधील, जे रात्रंदिवस परमेश्वराच्या नियमशास्त्रात आनंद मानतात, त्यापैकी किती झाडे निपुत्रिक होती? हजारो, कदाचित लाखो. “जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते (स्तोत्र १:३). असे म्हणू नका, “मी एक सुके झाड आहे.” त्याऐवजी म्हणा, “मी एक हिरवेगार झाड आहे, देवाने लावलेले रोप, सत्य आणि कृपेच्या प्रवाहाजवळ, आणि माझे जीवन सार्वकालिक फळ देणार आहे.”

Previous Article

तो पुन्हा उठला – जगाला धोक्याची सूचना देण्यासाठी

You might be interested in …

पवित्र शास्त्राचं कार्य

लेखांक ६ वा                              थोडी उजळणी करू. तारणाच्या योजनेत तारणाचे मूळ केंद्रस्थान कुटुंब. तारणाचं साधन म्हणजे कुटुंबातील उपासना. त्या उपासनेचा जीव म्हणजे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्राचं शिक्षण उपासनेमध्ये प्राप्त होतं. त्या शिक्षणात कायम टिकायचं असतं. […]

ईयोब आपल्या यातनांशी झगडतो

सॅमी विल्यम्स धडा ६ वा ईयोब ३:१-१० आपण काव्यात्मक लिखाणाचा अभ्यास करत आहोत –  ईयोबाच्या सुखी जीवनाला कशी कलाटणी मिळाली याचे कथानक आपण १ व २ अध्यायात पहिले. तो अगदी एकटा पडला. भयानक शारीरिक यातनादायी […]