जून 16, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

एका देवभीरू सासूचे कौतुक

टॅनर के स्वानसन

माझी सासू ही माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणींपैकी एक आहे. जेव्हा मी असे म्हणते, तेव्हा बहुतेकांचे तोंड एखाद्या कढईतल्या पॉपकॉर्नप्रमाणे आश्चर्याने उघडेच राहते. सौजन्याला काही बोलण्याची संधी मिळण्याआधीच, त्या धक्क्यातून बाहेर पडणारे शब्द असे असतात: “हे नक्की घडले तरी कसे?”

हे नक्की कसे घडले नाही, ते आधी सांगते: हे काही एका रात्रीत घडले नाही. नुकत्याच ओतलेल्या काँक्रीटला पूर्णपणे मजबूत होण्यासाठी चार आठवडे लागतात. जिथे नुकत्याच झालेल्या लग्नाचा प्रश्न असतो, तिथे एका नवीन कुटुंबाचे, जुन्या कुटुंबाशी दृढ नाते निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. माझी सासू आणि मी, या नात्यातील नेहमीच्या, कधीकधी डोळ्यांत पाणी आणणाऱ्या संघर्षांपासून काही वेगळ्या नव्हतो. मी खरोखरच या कुटुंबाचा एक भाग आहे का? किती जवळीक असणे योग्य आहे? आम्ही आठवड्यातून, महिन्यातून किंवा वर्षातून किती वेळा एकमेकींना भेटले पाहिजे? पण कोणत्याही संघर्षापेक्षा अधिक टिकून राहिलेली गोष्ट म्हणजे, आमच्या  विवाहावर ओझे टाकण्याऐवजी त्याला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या सासूचे समर्पण.

मुख्यतः याच कारणामुळे, आज ती माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणींपैकी एक आहे. तिचे जाहीरपणे कौतुक करताना, मला सर्व सुनांना आणि सासवांना उत्तेजन देण्याची आशा आहे. सुनांनी आपल्या पतीच्या आईमध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा अधिक बारकाईने शोध घ्यायला शिकावे; आणि सासवांनीही  त्या— देवावरील विश्वासाने मिळणाऱ्या कृपेच्या जोरावर—वर्षानुवर्षे अधिकाधिक प्रेमळ आणि आदर्श बनण्याचा प्रयत्न करावा—अगदी माझ्या सासूप्रमाणेच.

तर मग ज्यांचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले आहे, त्यांच्यासाठी हे सांगते की, हे नक्की घडले तरी कसे.

एका सासूचे प्रेम

जेव्हा मी प्रेषित पौलाने प्रीतीवर लिहिलेला १ करिंथ चा १३ वा उत्कृष्ट अध्याय वाचते, तेव्हा कधीकधी माझ्या मनात असा विचार येतो: “बस, हेच ते! हेच ते कारण आहे ज्यामुळे माझी सासू इतकी कौतुकास पात्र ठरते.” यातील ४ ते ६ ही वचने मला सर्वात जास्त भावतात:

‘प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते.”

सासू-सासऱ्यांनी यातील प्रत्येक वाक्यांशावर चिंतन करणे हिताचे असले, तरी आपण प्रेमाच्या केवळ तीन लक्षणांवर लक्ष केंद्रित करणार आहोत: “सहनशील आणि दयाळू,” “हेवा करत नाही किंवा बढाई मारत नाही,” आणि “आपलाच हट्ट धरून बसत नाही.” सुना आणि सासूबाईंना एकमेकींशी जुळवून घेणे किती कठीण जाते (एकमेकांसोबत आनंद घेणे तर दूरच), याचा विचार करा की जेव्हा बायबलमधील प्रीती सासरच्या मंडळींसोबतच्या त्यांच्या नात्याचे सर्वोत्तम चित्रण करेल, तेव्हा ख्रिस्ती लोक पाहणाऱ्या जगासमोर किती मोठी साक्ष देऊ शकतील.

सहनशील आणि परोपकारी

देवाच्या योजनेनुसार, नवीन पत्नी त्यांच्या नवीन आईपेक्षा वयाने लहान असतात. वयाने लहान असल्यामुळे, नवीन पत्नींना (बहुधा) खूप परिपक्व व्हायचे असते. जसजशा त्या परिपक्व होतात, तसतशा त्यांच्याकडून चुका होतात. त्या   लग्नाच्या वाढदिवशी बाथरूममध्ये रडतील आणि अविचारी संदेश पाठवतील; त्या आपल्या पतीच्या निष्ठेवर शंका घेतील आणि त्याच्याशी नजर मिळवणे टाळतील. देव नवीन पत्नींना कोणत्याही प्रकारे घडवत असला तरी, त्यांना त्यांच्या सासूबाईंकडून संयम आणि दयाळूपणा हाच फार आवश्यक आहे.

निश्चितच, पवित्र आत्मा तारण पावलेल्या सासूबाईंनाही पवित्र करत आहे. पण आमच्या नात्यात, माझ्या सासूबाई त्यांच्या वयाला साजेसे वागल्या आहेत: अधिक समजूतदार आणि अनुभवी. त्यांना माहीत आहे की मला गोष्टी समजून घेण्यासाठी, पाहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी वेळेची गरज आहे, आणि म्हणूनच त्या मला वेळ देतात. या संपूर्ण काळात, आमचे मतभेद झाले तरीही, त्या मला शत्रू नव्हे, तर मैत्रीण म्हणूनच वागवतात. त्या माझे भले करण्यास कधीही थकल्या नाहीत (गलती. पत्र ६:९).

तुम्ही एक थकलेली सासू आहात का? संयम आणि दयाळूपणा तुम्हाला उभारी देईल.

प्रीती हेवा करत नाही; बढाई मारत नाही

जर सासूचे प्रेम “सहनशील आणि दयाळू” असेल, तर तिचे प्रेम करत नाही  अश काही गोष्टी आहेत. विशेषतः, तिचे प्रेम “हेवा करत नाही किंवा बढाई मारत नाही” (१ करिंथ. १३:४). एखादी सासू आपल्या सुनेवर मनापासून प्रेम करते का? तसे असल्यास, ती तिचा मत्सर करणार नाही; तसेच पत्नी किंवा आई म्हणून स्वतःच्या गुणांची बढाई मारणार नाही — मग ती बढाई मनातल्या मनात असो किंवा कुटुंबाच्या बैठकीच्या खोलीत.

माझ्या सासूबाईंनी माझ्या पतीला आणि त्याच्या तीन बहिणींना कसे वाढवले, याच्या बारीक-सारीक तपशीलांबद्दल मला फारशी माहिती नाही. त्यांनी  मुलांना मदतीशिवाय कसे सांभाळले, दोन वर्षांच्या आतच मुलांना टॉयलेट ट्रेनिंगची सवय लावली होती का, किंवा त्या सकाळ-दुपार-रात्र सतत घरकाम करत होत्या का — हे मला माहीत नाही. मला हे माहीत नाही, कारण त्या कधीच बढाई मारत नाहीत, मग ती कितीही छोटी किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाची का असेना. त्या कधीच स्वतःच्या निवडींना अशा प्रकारे समोर मांडत नाहीत, जणू काही त्या एखाद्या ‘ मासिकात’ छापून येण्यायोग्य आहेत, आणि माझ्या निवडींना मात्र ‘ड्राय क्लीनर’ किंवा ‘मार्गदर्शकाची’ गरज आहे.

माझ्या सासूबाईंच्या या बढाई न मारण्याच्या वृत्तीमागे ‘मत्सर नसणे’ हे कारण दडलेले आहे. त्या मला विवाह आणि मातृत्व यांसारख्या सर्वच बाबतीत आपली स्पर्धक मानत नाहीत. त्या मला त्यांच्या मुलाची पत्नी म्हणून पाहतात —आपल्या मुलाची निष्ठा जिच्यासाठी आता सर्वप्रथम असायला हवी ती स्त्री. त्या मला त्यांची “दत्तक” कन्या म्हणून पाहतात; त्यांच्या इतर सर्व मुलांप्रमाणेच, जिच्या मनातही काही भीती, गरजा आणि स्वप्ने आहेत, अशी एक तरुण स्त्री. अखेरीस त्या मला “जिच्यासाठी ख्रिस्ताने आपला प्राण दिला,” अशी व्यक्ती म्हणून पाहतात (रोम. १४:१५). एक अशी बहीण, जी त्यांना सदैव लाभलेली असेल; विवाहसंबंध आणि “सासू” व “सून” यांसारखी पदे किंवा नाती काळाच्या ओघात विरून गेल्यानंतरही, अनंत युगांपर्यंत ती बहीण त्यांच्यासोबत असेल.

तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांवर प्रेम करायला आवडेल का? मग प्रीतीचे जे गुण आहेत, त्याप्रमाणेच वागा; कोणाचाही मत्सर करू नका आणि स्वतःची बढाई मारू नका.

केवळ स्वतःचाच हट्ट धरून बसत नाही

आमच्या लग्नाच्या वेळी माझ्या सासूबाईंनी एक भाषण केले होते. माझ्या पतीला उद्देशून बोलल्यानंतर, त्या माझ्याकडे वळल्या. माझ्या डोळ्यांत डोळे घालून त्यांनी मला एक वचन दिले — ज्याचा सारांश असा होता की, त्या आता त्यांच्या मुलाला (माझ्या पतीला) माझ्या स्वाधीन करतील. तो आता माझी जबाबदारी होता, त्यांची नव्हे. त्या आमच्या खाजगी बाबींमध्ये विनाकारण डोकावणार नाहीत; तसेच त्यांना न मागितलेला सल्लाही देणार नाहीत. हे बोलत असताना, वीस वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेल्या आईने हे आग्रहाने सांगितले की, आमचे हे नवीन कुटुंब—जे अवघ्या काही तासांचेच होते—ते माझ्या आणि माझ्या पतीच्या प्राधान्यक्रमात सर्वात वर असायला हवे; आणि या गोष्टीचा तिला मनापासून आनंद होत होता.

तिने आपले वचन पाळले आहे.

सासूचे प्रेम जेव्हा “आपलाच हट्ट धरून बसत नाही” तेव्हा ती किती मोठी देणगी असते! जेव्हा जुनी कुटुंबे विस्तारतात आणि त्यातून नवीन कुटुंबे आकारास येतात, तेव्हा स्वार्थीपणे “आग्रह धरण्याच्या”—म्हणजेच आपलाच हक्क सांगण्याच्या, मागण्या करण्याच्या किंवा इतरांना दडपून टाकण्याच्या—अनेक संधी निर्माण होतात. परंपरा पाळण्यापासून ते सुट्ट्यांच्या नियोजनापर्यंत, चर्चला जाण्यापासून ते दुपारच्या झोपेच्या वेळांपर्यंत, एका आईकडे “आपल्या स्वतःच्या पद्धतींचा” अनेक दशकांचा अनुभव गाठीशी असतो. लग्नाची अंगठी बोटात सरकते न सरकते तोच, शेकडो नवीन मार्ग समोर येतात; कारण पती आणि पत्नी एकमेकांना घट्ट धरून ठेवण्याचा, एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार करतात.

त्या बदल्यात, ती आई आपल्याच पद्धतींना घट्ट धरून बसेल का? की मग ती आपल्या कुवतीनुसार, केवळ स्वतःच्याच हिताचा विचार न करता—तर त्याहीपेक्षा अधिक—आपल्या मुलाच्या आणि त्याच्या नवीन पत्नीच्या हिताचा विचार करण्याचा प्रयत्न करेल (फिलिप्पै. २:४)?

“आग्रह न धरणे” ही दुतर्फा चालणारी प्रक्रिया आहे. जर माता आणि मुलींनी प्रेषित पौलाचे हे शब्द आपल्या मनात, हृदयात आणि घरात जपून ठेवले, तर सासू-सुनेची नाती किती सुंदर दिसतील, याचा जरा विचार करून पहा.

प्रीती कधीही खुंटत नाही

लहान मुलांची आई असताना, सासू असण्यात कोणत्या अडचणी असतात, हे अनुभवणे मला अजून बाकी आहे. पण माझ्या पतीच्या आईमुळे, या नात्यातील गुंतागुंत किती सहजतेने आणि शालीनतेने हाताळता येते, हे मला नक्कीच समजले आहे. लोकांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या त्या आश्चर्यचकित प्रतिक्रिया (पॉपकॉर्नच्या दाण्याप्रमाणे अचानक उसळणाऱ्या) पाहण्यात मला मजा येत असली, तरी आमच्या मैत्रीच्या खोलीबद्दल इतरांना सांगण्यामागे आणखी एक अधिक महत्त्वाचे कारण आहे: जेव्हा सासू-सुनेमधील ती नेहमीची, डोळ्यांत पाणी आणणारी कटकट इतकी मोठी ठरत नाही की ज्यामुळे प्रेमाचाच अंत व्हावा—तेव्हा आपला देव किती महान आहे, हे जगाला दिसून येते. कारण “प्रीती कधीही खुंटत नाही” (१ करिंथ. १३:८ पं.र.भा.).

Previous Article

अधीरता म्हणजे नियंत्रण करण्यासाठी युद्ध

You might be interested in …

धडा ६.    १ योहान १:१०-२:२.     खरी शांती स्टीफन विल्यम्स

  तुम्ही कधी कोणाविषयी कटुता बाळगली आहे का? कटुतेला पूर्ण विराम देण्याचा अतिशय परिणामकारक तुमचा अनुभव कोणता? कटुता मिटली नाही, तर दोन मार्ग राहातात. ▫         ज्या व्यक्तीने अन्याय  केला आहे, तीच स्वत: तो मिटवण्यासाठी काहीतरी […]

उगम शोधताना नील अॅन्डरसन व हयात मूर

नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर अनुवाद : क्रॉसी […]