जुलाई 14, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

त्याचे विश्वासूपण विसरू नका

कॅरिस कॉम्प्टन

“माझे गाडीवर नियंत्रण नाहीये.”

नॉर्थ कॅरोलिना येथील आमच्या वार्षिक थँक्सगिव्हिंगनंतर घरी परतताना  एका तासानंतर, माझ्या पतीच्या शब्दांनी माझी झोपमोड केली. काही सेकंदातच, ताशी ७० मैलांपेक्षा जास्त वेगाने धावणारी आमची व्हॅन, काळ्या बर्फाच्या एका थरावर गेली, तिचे नियंत्रण सुटले, रस्त्यावरून घसरली आणि केबलच्या दुभाजकावर आदळली, ज्यामुळे आम्ही पुन्हा रस्त्यावर आलो — पण आता समोरून येणाऱ्या वाहतुकीच्या दिशेने. गाडीवर पुन्हा नियंत्रण मिळवून, माझ्या पतीने आमची आता पूर्णपणे खराब झालेली टोयोटा सिएना दोन लेनमधून चालवत एका दैवी योजनेनुसार असलेल्या एक्झिट रॅम्पवर नेली. आम्ही त्या लेनमधून जात असताना, आमच्या गाडीच्या तुकड्यांचा कचरा महामार्गावर पसरलेला माझ्या लक्षात आला. आणि आम्ही रस्ता ओलांडून बाहेर पडत असतानाच, दुसरी एक गाडी त्याच काळ्या बर्फाच्या थरावर आदळून रस्त्याच्या कडेला फेकली गेली, हे मी पाहिले. हा संपूर्ण प्रकार दहा, कदाचित पंधरा सेकंद चालला, ज्यामुळे आम्हांला आमच्या मुलांना धोक्याची सूचना देण्यासाठी आणि मदतीसाठी येशूला हाक मारण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. आणि त्याने मदत केलीच.

धक्क्यात असताना, आम्ही एकमेकांची विचारपूस केली. गाडी पूर्णपणे खराब झाली होती, पण देवाने आम्हाला कोणत्याही शारीरिक इजांपासून वाचवले होते. जीवनाच्या क्षणभंगुरतेच्या झालेल्या या ताज्या मुकाबल्यानंतर आम्हाला वाचवले म्हणून आम्ही उत्स्फूर्तपणे देवाची स्तुती केली. त्यानंतर पुढील काही तासांत, जसजसा धक्का कमी झाला, तसतशी उत्सुकता वाढली.

“तुम्ही आतापर्यंत वापरलेल्या सर्व गाड्यांबद्दल आम्हाला सांगा,” माझ्या एका मुलाने सुचवले. आणि मग एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. आम्ही वर्षानुवर्षे देवाने केलेल्या मदतीच्या कथा सांगू लागलो. आमच्या गाडीच्या इतिहासाची उजळणी करत असताना, आमच्यासाठी देवाने केलेल्या विश्वासू कामांच्या एका संग्रहालयात आम्ही एक मानसिक फेरफटका मारला. आश्चर्यकारक मदत आणि अनपेक्षित उदारतेच्या कथांनी संग्रहालयाच्या भिंती भरल्या होत्या. आमचे कुटुंब, मित्र आणि उदार चर्च सदस्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या खूप पूर्वी विसरलेल्या आठवणी पुन्हा जागवल्या. आणि मी त्या मेकॅनिकला कसे विसरू शकते, ज्याने एका गरीब कॉलेज विद्यार्थिनी म्हणून माझ्यावर दया केली आणि तुटलेला होज (hose) शोधून काढण्यासाठी आणि तो दुरुस्त करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही?

आम्ही आमच्यासाठी देवाने घेतलेल्या वैयक्तिक काळजीची आठवण काढत असताना, आमची हृदये त्याच्या चांगुलपणाने पुन्हा एकदा भरून आली. त्याच्या भूतकाळातील विश्वासूपणाची आठवण करून, कदाचित यावेळी तो मदत करण्यात अपयशी ठरेल अशी आमच्या मनात  निर्माण होणारी शंका दूर झाली. त्या क्षणी, आम्ही त्याची कृत्ये पुढच्या पिढीला सांगण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही (स्तोत्र १४५:४). आमच्या जीवनातील घटनांचा इतिहास हा देवाच्या सामर्थ्याकडे पाहण्याचा एक छोटासा दृष्टिकोन होता, आणि प्रत्येक कथा विस्मृतीच्या विषावर एक उतारा होती. जर आपण आपल्या कुटुंबाचा इतिहास, नोकरीचा इतिहास किंवा आरोग्याचा इतिहास पाहिला तर काय होईल? वर्षानुवर्षे देवाने केलेल्या सर्व तरतुदी आणि सुटकेच्या कथा सांगायला लागलो, तर आपला वेळ अपुरा पडेल.

जेव्हा कथाकार शांत होतात

विसरणे हा मानवी स्वभाव आहे. मिसरमधून सुटका झाल्यानंतर आणि वचनदत्त देशात प्रवेश केल्यावर इस्राएलला विस्मृतीच्या रोगाने ग्रासले. शास्ते ३:७ मध्ये असे नोंदवले आहे की, “ते आपला देव परमेश्वर याला विसरले.” शास्ते ८:३४ मध्येही इस्राएलवर असाच आरोप केला आहे की, “त्यांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यांना चोहोबाजूंच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवले होते, त्याचे स्मरण ठेवले नाही.”

वर्षे लोटत गेली तसे, त्यांच्या सुटकेचा आनंद दूरच्या आठवणीत विरून गेला. कुटुंबे जमीन कसण्यात आणि पिकांचा आनंद घेण्यात व्यस्त झाली. तृप्त झालेले पालक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी देवावर अवलंबून राहण्यास विसरले. आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांसारखे होण्याचे प्रलोभन त्यांना पडले आणि त्यांनी देवाबरोबर केलेल्या कराराची आठवण त्यांच्या मनातून नाहीशी झाली. नवीन चिंतांनी मूळ धरले आणि पूर्वीच्या संकटांमधून देवाने केलेल्या सुटकेच्या कथांना मागे टाकले. ज्या पालकांच्या मनात देवाच्या विश्वासूपणाच्या कार्यांचे संग्रहालय होते, ते शांत झाले, “ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती ” (शास्ते २:१०).

“देवाच्या विश्वासूपणाच्या आपल्या कथा पुन्हा पुन्हा सांगणे हे आपल्या हृदयाला विस्मृतीपासून वाचवते.”

पण मानवी विस्मृतीच्या पार्श्वभूमीवर, सर्वकाळ विश्वासू असलेला देव आपले कार्य करत राहिला. शास्ते पुस्तकाचा लेखक दैवी सुटकेच्या घटनांची मालिका नोंदवतो, जी पुढील पिढ्यांना परमेश्वराला पाहण्यासाठी आणि ओळखण्यासाठी पुरेशी होती. शास्त्यांच्या रंगतदार कथांमध्ये, इस्राएल लोक देवाची आश्चर्यकारक तरतूद, अनपेक्षित सोडवणारे आणि अपारंपरिक नायकांची आठवण करू शकत होते. प्रत्येक कथा देवाच्या विश्वासूपणाच्या संग्रहालयातील एक नवीन प्रदर्शन बनली होती — विस्मृतीच्या प्राणघातक विषावरील दैवी उतारा. आणि तरीही, पुढील पिढ्या शांत राहिल्या, ज्यामुळे त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या मुलांना विस्मृतीच्या धोक्यात टाकले.

जर इस्राएलने एहूदची कथा पुन्हा पुन्हा सांगितली असती तर किती बरे झाले असते — तो अपारंपरिक डावखुरा, ज्याने स्वतःचे शस्त्र बनवले आणि इस्राएलचा जाडजूड जुलमी राजा एग्लोनला मारण्यासाठी एक धाडसी योजना आखली. लहान मुलांना तर ही कथा विशेषतः आवडली असती! दबोरा, बाराक आणि ताबोर पर्वतावर कनानी लोकांच्या पराभवाची कथा नक्कीच  पुन्हा सांगण्यासारखी होती. पराक्रमी सिसेरावर मात करण्यासाठी स्त्रीशक्तीचा वापर करून, याएल इस्राएलच्या एका युद्धगीताची अनपेक्षित नायिका बनली. एक गीत जे नंतर इस्राएलच्या मनाच्या खोल कोपऱ्यात हरवून गेले. तुम्हाला वाटेल की इस्राएलला गिदोनाची कथा पुन्हा सांगायला आवडले असते. तो घाबरट शेतकऱ्यासारखा माणूस जो विश्वासाने उठला आणि केवळ तीनशे माणसे, काही मशाली आणि काही मातीच्या भांड्यांसह मिद्यानी लोकांच्या सैन्याचा धैर्याने पराभव केला.

एकामागून एक कथा, एकामागून एक रंगतदार पात्रे, देवाने विसरभोळ्या लोकांना आपली शक्ती दाखवली. इस्राएलच्या चुकीतून आपण हे शिकतो: तुमच्या कथा सांगणे कधीही थांबू नका! “त्या [आमच्या] मुलांपासून गुप्त न ठेवण्याचा, तर येणाऱ्या पिढीला परमेश्वराची गौरवशाली कृत्ये सांगण्याचा” संकल्प करा (स्तोत्र ७८:४).

तुमच्या कथा सांगा

देवाच्या योजनेनुसार, आपल्या सर्वांकडे सांगण्यासारख्या कथा आहेत.

आपल्याला येशूपर्यंत पोहोचवणाऱ्या घटनांच्या मालिकेबद्दल आपण सांगू शकतो. आपल्या संपूर्ण आयुष्यात देवाच्या तरतुदीच्या सामान्य आणि असामान्य कथांमध्ये आपण आनंद मानू शकतो. मी तुम्हाला सांगू शकेन की जेव्हा आम्ही आमच्या घरासाठी हप्ते  भरताना खूप अडचणीत होतो , त्यावेळी आमच्या मालमत्तेला लागलेली आग आणि मुदत संपलेली विमा पॉलिसी वापरून देवाने आम्हाला आर्थिकदृष्ट्या कसे स्थिर केले. किंवा त्याने एका कठीण स्थलांतराचा उपयोग कसा केला. ज्याबद्दल मला वाटले होते की ते माझ्या मुलाच्या हृदयात कडवटपणा निर्माण करेल, पण त्याऐवजी त्याने त्याला येशूचे अनुसरण करण्याच्या चांगुलपणाबद्दल पटवून दिले.

तुमच्याबद्दल काय? देवाने तुमच्या जीवनाचे रक्षण केले आहे का? त्याने तुम्हाला खोलवर रुजलेल्या पापांपासून क्षमा करून मुक्त केले आहे का? त्याने एखाद्या बिकट परिस्थितीतून सुटका केली आहे का? कदाचित जेव्हा तुम्हाला अडकल्यासारखे वाटत होते, तेव्हा त्याने सुटकेचा मार्ग दाखवला असेल किंवा एखाद्या अंधाऱ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितीत प्रकाश टाकला असेल. त्याने निश्चितपणे अपेक्षित आणि अनपेक्षित दोन्ही मार्गांनी अन्न, पैसा, वस्त्र, निवारा आणि काम पुरवले आहे. संकटाच्या वेळी तो तुमचा तत्पर साहाय्यक ठरला आहे. त्याने कृपेने दुसऱ्या विश्वासणाऱ्याच्या हाताचा उपयोग करून तुम्हाला समुद्रातून मार्ग दाखवला आहे (स्तोत्र ७७:१९-२०).

अनेकदा, जेव्हा आपण बोलायला हवे असते, तेव्हा आपण शांत राहतो. देवाच्या विश्वासूपणाची उदाहरणे आवरून ठेवली जातात आणि दीर्घकालीन साठवणुकीत ठेवली जातात, जिथे ती दुर्लक्षित आणि विसरली जातात. आपण   विसरतो, त्यामुळे विस्मरण वाढते आणि कृतघ्नता, स्वत:ची कीव आणि देवाच्या स्वभावाबद्दल शंका रुजतात. पण जर आपण दाविदाप्रमाणे, ‘त्याचे  सर्व उपकार विसरू नको’ (स्तोत्र १०३:२) असे निवडले, तर आपण आपल्या आत्म्याचे किती भले करू शकतो आणि जर आपण देवाच्या गौरवशाली कार्यांची साक्ष देण्यासाठी आपले तोंड उघडले, तर आपण पुढच्या पिढीसाठी किती चांगले करू शकतो.

देवाच्या विश्वासूपणाच्या आपल्या कथा पुन्हा पुन्हा सांगणे हे आपल्या हृदयाला विस्मरणापासून वाचवते आणि त्या कथा ऐकणे हा लहान हृदयांमध्ये देव  विश्वास निर्माण करतो त्या मार्गांपैकी एक आहे.

प्रिय वाचकांनो, तुमच्या विश्वासूपणासाठी आणि पुढच्या पिढीच्या विश्वासूपणासाठी, तुमच्या कथा सांगणे कधीही थांबू नका!

Previous Article

दररोजच्या निर्णयांमध्ये  देव कसे चालवतो

You might be interested in …

देवावरआशा ठेवण्याचे धाडस करा मार्क रोगॉप

ह्या जगामध्ये आपण आक्रोश करतच जन्माला येतो. जरी आपल्या कोणालाच तो क्षण आठवत नाही तरी आपल्या मातेच्या उदरातली ते उबदार आणि सुरक्षित सीमा सोडताना आपण एक मोठा विरोध करत ते मोठे रडणे करतो. हंबरडा फोडतच […]

कठीण काळामध्ये वधस्तंभाचा दिलासा

स्टीफन विल्यम्स “ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या […]

आपल्या मुलांना शिकवण्यासाठी दहा आवश्यक धडे  

 जॉन मकआर्थर (जॉन मकआर्थर यांच्या “ब्रेव डॅड या पुस्तकातून हे दहा धडे घेतले आहेत. नीतीसूत्रे १-१० मधून घेतलेले हे धडे पालकांना आपल्या मुलामुलींना शिकवण्यास अत्यंत उपयुक्त ठरतील. जर आपण ते शिकवले नाहीत तर सैतानाला आपण […]