जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

इतरांचे भले चिंता

ग्रेग मोर्स

माझ्या पत्नीवर त्या पापाचा परिणाम पाहीपर्यंत मला ते दिसतही नव्हते. इतकी उत्साही, बालसदृश, तडफदार, असणारी ती आता सहजतेने विनोद करेना, तिचे हास्य मावळले. ती शांत झाली, तिच्यातला जोम कमी झाला, ती पूर्वीची राहिली नव्हती. माझे फूल माझ्यासमोर कोमेजू लागले.

कोणताही नवरा करेल तेच मी करणार होतो, मला तिला मदत करायची होती. एके दिवशी मी तिला विचारले की, असा बदल का झालाय तुझ्यात? आणि लवकरच त्याचा उगम मला उमगला ज्याची मी अपेक्षा केली नव्हती : मी.

माझी लोकांची टीका करण्याची वृत्ती. आणि जसे गवतामध्ये तण वाढते तसे ते माझ्यापुरतेच राहिले नाही. माझी शंका तिची झाली.

टीका आणि शंकेखोर वृत्ती याचा मला चांगला अनुभव आहे. ती आपल्या मनात शिरते आणि आपण स्वत:साठीच विश्वासघातकी बनतो.  कुटुंबाला धोका ठरतो आणि मंडळीसाठी विष बनतो. आपली शंका आपले जे जवळचे आहेत त्यांच्यावर आघात करते. त्यामध्ये एक स्वयंपूर्ण भविष्य असते: जितके अधिक आपण संशय बाळगतो तितके संशय धरायला आपल्याला कारणे मिळू लागतात, जितका अविश्वास आपण दाखवतो तितकी अविश्वास दाखवायला अधिक कारणे आपल्याला मिळतात. प्रत्येक किणकिण धोक्याचा गजर होऊ लागते.

आपल्या प्रियजनांबद्दल अथवा शेजार्यांबद्दल वाईट विचार करणे हे अन्यायी आणि अविश्वसनीय असते आणि ते सहज न दिसता खपून जाते. पण जर आपल्या पापांची देवाने क्षमा केली असेल (आणि ख्रिस्तामध्ये ती झाली आहेच) तर आपली धूर्त शंका आणि अविश्वास खाली ठेवण्यास आणि इतरांचे भले चिंतण्यास आपण मोकळे केलेले आहोत.

शंकेच्या युगामध्ये प्रीती

आपण पतित स्त्री पुरुष आहोत व पापाचा कल आपल्याला किंग लियरप्रमाणे बोलण्यास भाग पाडतो की, “ मी असा पुरुष आहे की माझ्या पापांपेक्षा माझ्याविरुद्ध अधिक पाप केले गेले आहे.” आपल्याला कोणीही न शिकवता आपल्याला सहज दिसते की आपल्या बहुतेक समस्या “बाहेरच्या” दुसऱ्या लोकांमुळे आहेत. माझे पवित्र देवाविरूद्धचे पाप नाही तर त्यांचे माझ्याविरुद्धचे पाप मला अधिक त्रास देते. आणि जेव्हा हे आपले लक्ष्य असते तेव्हा आपण बोलायला तत्पर आणि ऐकायला मंद, इतरांना तुच्छ मानायला तत्पर आणि त्यांचे सहन करायला मंद, शंका घ्यायला तत्पर तर क्षमा करण्यास मंद असतो.

ही वृत्ती आत्म्याच्या वृत्तीपुढे, ख्रिस्ताच्या आत्म्यापुढे आणि ख्रिस्ती व्यक्तीच्या वृत्तीपुढे लावून पाहा.

“प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते; ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते” (१ करिंथ १३: ४-७).

या युगाचा आत्मा जर शेजार्‍याने गोंधळदायक उद्गार काढले तर त्याला वाईट लेखतो. ख्रिस्ती व्यक्तीचा आत्मा त्याचा निराळा अर्थ लावून त्याला भले लेखतो.  ख्रिस्ती व्यक्तीचा आत्मा स्वत:च्या डोळ्यात मुसळ आहे का ते तपासतो  (मत्तय ७:३-५). हे नेहमी लक्षात ठेवून की “माझ्याविरुध्द केलेल्या पापापेक्षा माझे पाप अधिक आहे.” तो आपला न्याय उदारपणे जसे स्पष्ट दिसते तितकाच करतो आणि मग त्या व्यक्तीकडे जाऊन बंधू या नात्याने त्याबद्दल त्याच्याशी चर्चा करतो (मत्तय १८:५).

दुसर्‍याचा प्रभाव अथवा मालमत्तेचा हेवा करण्याऐवजी, उद्धट किंवा गर्वाने वागण्याऐवजी, नवऱ्याने स्वत:च्याच मनासारखे वागण्याचा हट्ट करण्याऐवजी, बायकोने चिडखोर व नाखुशीने वागण्याऐवजी ख्रिस्ती प्रीती ही – कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये, जगामध्ये वेगळे वागण्यासाठी सुसज्ज आणि समर्थ असते. जेव्हा शंकेमुळे हास्य मावळले जाते, आणि अविश्वासाने मैत्रीचा नाश होतो, तेव्हा देवाच्या लोकांनी या शंकेखोर जगात उजळायला पाहिजे. “प्रीती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते” (१ करिंथ १३:७).

प्रीती, कृपा आणि सहनशीलता असलेला हा समाज हळूहळू पण नक्कीच वाढत जातो. वाटेत जरी तो जरी इतरत्र भटकला, मागे पडला तरीही तो अक्षरश: वाढतच राहतो. देवाचा आत्मा राहतो अशा लोकांचा हा वारसा आहे आणि आपल्याला निरखणाऱ्या व आपल्यावर नखे उगारणाऱ्या समाजाला ही साक्ष आहे (योहान १३:३५).

भले ते चिंतण्यास मुक्त

तर ते काय पाहतात? ख्रिस्ताच्या प्रीतीला आणि क्षमेच्या नियमाला समर्पित असलेली कुटुंबे, परिपूर्ण नसलेला तरीही आशा व क्षमा यांनी भरलेला समाज ते पाहतात का? मंडळीतले लोक एकमेकांचे ओझे वाहत आहेत व इतरांना समजून घेत आहेत असे ते पाहतात का? की त्यांना दुफळ्या, अविश्वास व मतभेद दिसत आहेत?

चार्ल्स स्पर्जन यांनी आपल्या एका विद्यार्थ्याला लिहिले, “शंकेखोर जीवन जगण्यापेक्षा शंभर वेळा फसवले गेलेले बरे” हे खरे नाही का? तिच्या इमेल मधला गुन्हा न पाहणे, त्याच्या कृतीत असलेल्या अपमानाकडे, एवढेच काय पण त्यांचा बधीरपणा, उद्धटपणा, चुका  असल्या तरी त्याकडे  दुर्लक्ष करणे बरे. जेव्हा पाप उघड असते तेव्हा असे आपण करू शकत नाही पण शंका असेल तर पापाची शक्यता त्याच खात्रीने आपण हाताळू शकत नाही. ख्रिस्ताने आपल्याला बंधनमुक्त केले आहे यासाठी की आपण इतरांबद्दल उत्तम आशा बाळगावी, त्यांचे उद्देश चांगले मानावेत आणि इतरांची गुप्त पापे त्यांच्या निर्माणकर्त्यापुढे सोपवून द्यावीत. हीच प्रीती पुष्कळ पापांची रास झाकते. मग ती प्रत्यक्ष अथवा काल्पनिक असोत. हे देवभीरू माणसाचे गौरव आहे जो स्वत:च्या अपमानाकडे दुर्लक्ष करतो.  “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे” (नीती १९:११)

दिवसाची मुले

ख्रिस्ती असल्याने आपल्याला मोलाने विकत घेतले गेले आहे. आपण आपले स्वत:चे नाहीत. स्पर्जन आपल्या विद्यार्थ्यांना उपाय सुचवतात, “भावांनो, स्वत:वरच्या प्रेमाचा त्याग करून शंकेची सवय दूर करा. लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात व काय विचार करतात ही क्षुल्लक बाब माना आणि ते आपल्या प्रभूला कसे वागवतात याची काळजी करा.”
मला कसे वागवले जाते, मला किती मोठे लेखले जाते, मला कसे समजून घेतले जाते, पाहिले जाते हे ख्रिस्ती जीवनाचे काम नाही. ते आपल्या पाठीमागे काय बोलतात त्यांच्या न दिसणाऱ्या मनाच्या कप्प्यात ते आपल्याला कसे वागवतात त्यांना आपण आवडतो की नाही, किंवा अमुक व्यक्तीचा काय उद्देश होता अशा विचारात गोवून घेणे हे नवीन जन्म झालेल्याचे जीवन नाही.

स्वत:ला महत्त्व देणारे स्वत:ला बंदिस्त करतात आणि  आपल्या भोवतालची फुले कोमेजून टाकतात. ख्रिस्त अशा फुलांना वर उचलतो आणि प्रत्येक गोष्टीसंबंधी विशेषत: इतर विश्वासीयांसबंधी  आशा धरायला मदत करतो. देवावर आपल्या शेजाऱ्यावर आपल्या सर्वस्वाने प्रीती करण्याने आपल्या नातेसंबंधांना प्रकाश आणि आशीर्वाद मिळतो…हे आपल्या जिवाला ताजे अन्न आहे. ख्रिस्ताच्या नावाला सन्मान देवून त्याचे आज्ञापालन करणे आहे.

तुम्ही इतराबाबत शंकेखोर आहात का? “आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो”  तीत ३:३); यामध्ये आपण पुष्कळ वेळ घालवला आहे. ख्रिस्त आपल्याला या शंकेच्या पडछायेतून बाहेर पडून दिवसाच्या मुलांसारखे प्रकाशात चालायला बोलावत आहे (१ करिंथ १३:७). ही वरून येणारी हवा आहे. जी हवा आपल्याला या दूषित आणि शंकेखोर जगात निरोगी आणि एकतेत ठेवेल.

Previous Article

काहीही होवो

Next Article

आपला देव ऐकतो

You might be interested in …

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर   अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण २२ एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे […]

“मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो”

मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.                                                       योहान १४:२७ लेखक: ऑस्वल्ड चेंबर्स आपल्या वैयक्तिक जीवनात काही  समस्या […]

आम्ही प्रार्थना कशी करावी?

वनीथा रिस्नर भंगलेली स्वप्ने  व वेदना समोर दिसत असताना आम्ही कशी प्रार्थना करावी? आम्ही फक्त देवाला विचारण्याची गरज आहे . देव सर्व काही करू शकतो अशा विश्वासाने देवाने आम्हाला बरे करावे आणि सुटका द्यावी म्हणून […]