जनवरी 29, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

प्रार्थनांची उत्तरे माझ्या चांगुलपणावर अवलंबून असतात का?

जॉन पायपर

आजच्या या विषयावर बायबल अगदी स्पष्ट सांगते. ते म्हणते: आपल्या प्रार्थनांचे उत्तर मिळावे म्हणून आपण देवाचे आज्ञापालन केले पाहिजे. हा मुद्दा परखड आणि आपले जीवन व्यापून टाकणारा आहे. बायबलमधले अनेक संदर्भ हे दाखवतात. उदा. यशया १: १५-१८, योहान १५: ७; १ योहान ३:२१-२३; १ पेत्र ३:७, १२, ४:७; याकोब ५:१६ इ. तर आपण यासाठी किती अधिक पवित्र व्हायला हवे? हे समजण्यासाठी आणखी दोन शास्त्रभागांवर विचार करू या.

देव शलमोनाला म्हणाला, “तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गांपासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन”  (२ इतिहास ७:१४).

स्तोस्त्रकर्त्याने स्वत:च्या अनुभवातून याबद्दल खात्री दिली, “मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता; पण देवाने ऐकलेच आहे; माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे” ( स्तोत्र ६६:१७-१९).

यामुळे मला जुन्या व नव्या करारातून दिसते की जर एखाद्या मुलाची वृत्ती वाईट असेल किंवा तो गैरवर्तन करत असेल तर देव तो जे काही मागतो ते त्याला देणार नाही. आपल्या प्रार्थनांची उत्तरे मिळावी म्हणून आपण आज्ञा पाळणारी मुले असायला हवे.

आता याबाबत दोन गैरसमज आहेत जे मला दूर करायला हवेत. या दोन्हींमुळे आपल्या विश्वासाचा आनंद कमी होऊ शकतो आणि देवाची दया कमी लेखली जाऊ शकते.

आज्ञापालन, परिपूर्णता नाही

हे ऐकून जर आपण म्हणालो की, आपल्या प्रार्थनांचे उत्तर मिळण्यासाठी आपण पूर्ण पापमुक्त असायला हवे तर ती फार मोठी चूक आहे. आज्ञाधारक मूल आणि परिपूर्ण मूल यात खूप मोठा फरक आहे.

तुम्हाला प्रभूची प्रार्थना ठाऊक आहे ना? प्रभूने शिकवलेल्या या प्रार्थनेच्या अगदी मध्यभागी येशूने आपल्याला एक विनंती करायला शिकवले. “आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस  ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड” (मत्तय ६:१२). याच्या आधी सुद्धा एक विनंती आहे “आमची रोजची भाकर आज आम्हांला दे”   (मत्तय ६:११) यावरून आपण ही प्रार्थना रोज करावी असे येशूने दाखवले. म्हणजेच आपण “ तू आमची ऋणे आम्हांला सोड” – आमच्या पापांची क्षमा कर  ही विनंती रोज करावी अशी येशूची अपेक्षा आहे. आपल्या शिष्यांच्या जीवनात पुढे पापांची  क्षमा कर हे म्हणण्याची गरज पडणार नाही अशी येशूची कल्पना कधीच नव्हती. जो मी  माझ्या वृत्तीने रोज न रोज पाप करतो त्या मला हा विचार  खूप आश्वासन देणारा आहे.

यातून मी अनुमान काढतो की: ज्या अर्थी त्याने आपल्याला अशी प्रार्थना करायला शिकवले त्याअर्थी आपल्या प्रार्थनांची उत्तरे मिळण्यासाठी आपण पापविरहित असावे असे म्हणणे हा विरोधाभास आहे.

 याकोब म्हणतो, “नीतिमान पुरुषाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबल असते” (याकोब ५:१६) तो  पापविरहित नाही तर तो पश्चात्तापी व्यक्ती आहे. तो पापात पडणारी व्यक्ती नाही. ज्या व्यक्तीच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत तो मोहाविरुद्ध झगडा करत नाही. तो वारंवार युद्धात हरतो आणि आपल्या सामान्य आध्यात्मिकपणात तो संतुष्ट असतो. आपला जगिकपणा आणि सुस्ती यावर मात करण्याचा तो काहीही प्रयत्न करत नाही. म्हणून प्रार्थनेचे उत्तर मिळण्यास मी परिपूर्ण असावे हा गैरसमज आपण दूर केला पाहिजे.

योग्यतेचा समावेश नाही

प्रार्थनेचे उत्तर मिळण्यासाठी दुसरा एक गैरसमज म्हणजे जेव्हा आपण आज्ञापालन करतो तेव्हा आपण लायक ठरतो व त्यामुळे  आपली प्रार्थना ऐकल्या जातात.  म्हणजे प्रार्थनांचे उत्तर मिळण्यासाठी काही योग्यता मिळवणे आवश्यक आहे असा त्याचा अर्थ होईल. पण हे आठवा की येशूने आपल्या मरणाद्वारे आपल्या प्रार्थनांची उत्तरे विकत घेतली आणि ती त्याच्या दयेद्वारे आपल्याला फुकट मिळतात.

देवाच्या दयेशी आपले आज्ञापालन निगडित आहे कारण आपण कोणीच नैसर्गिक रीतीने देवाचे मूल नाही. याउलट पौल म्हणतो की, “आपण स्वभावत: इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो” (इफिस २:३). याचा अर्थ त्याच्या दयेने, त्याच्या कृपेद्वारे,  त्याच्या कुटुंबामध्ये आपल्याला फुकट दत्तक घेतले गेले आहे. आपण देवासमोर उभे राहू शकतो ते आपल्यामध्ये काही गुणवत्ता आहे म्हणून नाही तर फक्त त्याच्या कृपेमुळे.

म्हणून या कुटुंबातील सर्व चांगले वर्तन या दयेवर अवलंबून राहिल्यानेच होते. ख्रिस्तासाठी असलेले व त्याला आनंद देणारे सर्व खरे आज्ञापालन हे देवाचे सामर्थ्य, शहाणपण व प्रीती यांच्यावर असलेल्या विश्वासातूनच उगम पावते.

देवाची आज्ञा न पाळण्याचे एकच कारण म्हणजे आपण त्याच्या सल्ल्यावर विश्वास ठेवत नाही.
माझी मुले माझी आज्ञा पाळत नाहीत कारण त्यांना मी जे सांगितले ते त्यांच्यासाठी चांगले आहे असे वाटत नाही. “तिथे खेळू नको” “अरे पण तिथे खेळण्यात जास्त मजा आहे म्हणून मी तिथेच खेळणार” म्हणजेच बाबा चूक आहेत म्हणून मी त्यांचे ऐकणार नाही. आपणही अशीच आज्ञा मोडतो. आपण देवावर विश्वास ठेवत नाही.

सर्व आज्ञा मोडणे देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास न ठेवल्यामुळे होते. यावरून दिसते की सर्व खरे आज्ञापालन देवावर विश्वास ठेवल्याने होते. देवावर त्याच्या दयेसाठी भरवसा ठेवणे आणि देवाने प्रार्थनेचे उत्तर द्यावे म्हणून आपली गुणवत्ता त्याच्यापुढे सादर करणे यात अफाट फरक आहे. गुणवत्ता स्वत:कडे पाहते आणि स्वत:च्या किमतीचा विचार करून आपण देवाला काय देऊ शकतो ते पाहते. दया ही स्वत:पासून दूर देवाकडे पाहते आणि माझ्यामध्ये लायकी नसल्याने देवाच्या दयेमध्ये किती किंमत आहे यावर विचार करते.

यामुळे देव आज्ञा पाळणार्‍यांच्या प्रार्थना ऐकतो, कारण ज्या विश्वासातून हे आज्ञापालन येते त्यामध्ये त्याला आनंद आहे. हा विश्वास तो पाहतो आणि या व्यक्तीला सर्वात कशाची किंमत सर्वात जास्त आहे हे त्याला दिसते. परंतु ह्या विश्वासात गुणवत्ता नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला प्रार्थनेचे उत्तर मिळते तेव्हा “ हे उत्तर मी मिळवले” असे कधीही म्हणू नका.

देवाच्या मुलांप्रमाणे विनंती करणे

आपण जर ह्या दोन चुका केल्या नाहीत (परिपूर्णता आणि कायदेशीरपणा) तर हे शिक्षण योहान ९:३१ नुसार खरे आहे. “आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो.”

ह्या शिक्षणाचे लागूकरण स्पष्ट आहे. त्यावर आणखी भर देण्याची गरज नाही. पण हे मी पुढील वाक्यात मांडतो. जेव्हा येशू आपल्याला मागा, शोधा , ठोका अशी आज्ञा करतो तेव्हा तो आपल्याला फक्त प्रार्थना करण्यासच सांगत नाही, तर आपला दयाळू पिता जसा वागतो तसे जगायला सांगतो. “माझी वचने तुम्हांमध्ये राहू देत. तुमच्या ह्रदयात कोणताही अधर्माचा आनंद मानू नका. इतर विश्वासी लोकांवर प्रीती करा. सर्वांचे भले करा. जुलूम करणे सोडून द्या. तुमची पापे कबूल करा…”  तो जसा प्रकाशात आहे तसे आपण जर प्रकाशात चालतो तर आपली त्याच्याशी खात्रीने सहभागिता राहील आणि आपल्याला आपल्या  प्रार्थनांची महान उत्तरे मिळतील.

Previous Article

हे जग सोडण्यास भिऊ नका

Next Article

माझ्यातला पशू जागा होतो

You might be interested in …

आनंदाचा विजय लेखक : डेविड मॅथिस

“चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा” (मार्क १६:६). पवित्र नगरातील त्या रस्त्यावरचे ते शब्द खरे वाटणार नाहीत […]

 विल्यम केरी

(१७६१- १८३४) लेखांक १४                                        आतापर्यंत आपण जर्मन व डॅनिश मिशनरी पाहिले. डॅनिश मिशनचा अस्त झाल्यावर इंग्लंडने भारतात जे मिशनरी पाठवले, त्यातील हा पहिला मिशनरी. १६०० मध्ये भारतात ब्रिटिश कंपनी आली. व्यापारात उत्तम जम बसूनही भारतात […]

पवित्र स्थानातील पडदा

तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मत्तय २७:५१. इतका जाड व मजबूत पडदा फाटून दुभागणे हा काही हलकाफुलका चमत्कार नाही; तसेच तो फक्त सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याकरताही केला नाही – यामध्ये बरेच धडे […]