सितम्बर 8, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

टीकाखोर हृदय धोक्यात असते

जेसिका बी.

स्नेह्यांसोबत आयोजिलेले जेवण आटोपते आणि तुम्ही त्यांना निरोप देता. घरी परतताना जेवणाच्या वेळी  तुमच्या डोळ्यांनी जे काही टिपलं होतं, ते आठवून तुम्हाला हुरूप येतो. आणि स्वतःला अंतर्ज्ञानी समजून तुम्ही त्यांच्यावर टीकेचा वर्षाव करता. आणि तुम्हाला खात्री असते की तुमचा नवरा मनात कौतुक करून म्हणत असेल की, व्वा! माझ्या बायकोला मानवी स्वभावाची किती जाण आहे.

वास्तविक, तुम्ही तुमच्या मित्राच्या जीवनशैलीचे खुनशी वृत्तीने विच्छेदनच करता, जसे जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत बेडकांचे करतात तस्से. आणि अशीही टीका करता, कोणाला माहीत होतं की त्यांना ऑगॅर्निक पदार्थांचे इतकं खूळ आहे! जरा थोडीफार घरकामाची सवय लावा म्हणजे मुले आपोआप सुधारतील! तुम्ही तुमच्या बेडकांच्या—म्हणजे, मित्रांच्या—उणिवांवर चार पाच उपाय घेऊन घरी पोहोचता. पण कुठेतरी अंतर्मनात तुम्हाला माहीत असतं की, त्यांच्यावर चिखलफेक करून तुम्ही स्वतःला श्रेष्ठ करता.

दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यात आणि त्यांच्या तथाकथित पापांचे आणि विक्षिप्तपणाचे पृथक्करण करताना एक नशा चढते आणि वेगळीच मजा येते. अमेरिकन लेखिका फ्लॅनरी ओकनोर यांनी आपल्या लघुकथांमधून दाखवले की, चाकोरी बाहेर असणाऱ्यांना घमेंडी लोक  सहजपणे पायदळी तुडवतात. त्यांनी ओळखले होते की, स्वतःला सुख मिळावे म्हणून इतरांचे दोष काढण्याची लोक खटपट करतात.

जगाच्या इतिहासात दोष दाखविण्याची वृत्ती आरंभीपासून  दिसून येते: सापाने देवाची निंदा केली, आदामाने हवेला दोष दिला, काईनाने हाबेलचा तिरस्कार केला, हामाने नोहाला लज्जित केले वगैरे. अर्थात, टीका खरी असू शकते आणि तिचा विचारपूर्वक उल्लेख करणे योग्यही असू शकते. (दावीद आणि नाथान यांचे उदाहरण घ्या.) पण अनेकदा, ज्या टीकेबद्दल आपल्याला फटके मिळायला हवे त्याऐवजी देव जो एकमेव न्यायाधीश आहे त्याच्या डोक्यावरील मुकुट आपण घेतो.

आपण थांबून हे कबूल करू या: न्यायाधीश आणि पंचाची भूमिका बजावणे हे सुवार्तेच्या विरुद्ध आहे.

देव, दयावान न्यायाधीश

सुवार्तेचा एक भाग हा आहे की, आपल्या सर्वात वाईट परिस्थितीतही येशूचे रक्त “चांगले वचन बोलते” (इब्री १२:२४).  आपण टोकाचे अपात्र आहोत. तरी त्याला आपण हवे आहोत. देवाला आपल्याला अंतिम, तत्काळ मृत्यूच्या हवाली करण्याचा पूर्ण अधिकार होता. जागच्याजागी आपल्याला मरताना पाहून त्र्येक देवाला आनंद होऊ शकला असता. पण त्याऐवजी, पित्याने आपले प्रेम आणि कृपा उघडपणे जाहीर केली. “त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे” (रोम. ३:२५). आपले तारण हा काही योगायोग नव्हता, किंवा देवाला एखाद्या चांगल्या दिवशी गाठल्याचा परिणाम नव्हता; उलट, “त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वीच त्याच्यामध्ये आम्हाला निवडले” (इफिस. १:४). देव मेलेल्या बेडकांचे बारीकसारीक दोष काढत नाही. तो त्यांना पुन्हा जिवंत करतो.

आपण लंगडत आहोत या जाणिवेसह इतरांकडे जाण्याचे कारण म्हणजे सुवार्ता. याकोबाला एसावाबद्दल फारसे चांगले काही म्हणायचे नव्हते. आपल्या मोठ्या भावाचा जेष्ठत्वाचा हक्क हिरावून घेण्यासाठी याकोब आपल्या आईच्या कटात सामील झाला. अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे याकोबाला आपल्या कुटुंबापासून दूर पळून जायला भाग पडले— अखेरीस एका अनपेक्षित संघर्षाद्वारे देवाने त्याला गाठले. खुब्याचे हाड निखळलेले असताना आणि नवीन हृदय मिळालेले असताना, याकोबाने घोषित केले, “मी देवाला समक्ष पाहिले तरी माझा जीव वाचला ” ( उत्पत्ती ३२:३०) .

खून करून सूड उगवण्याच्या ईर्षेला पेटलेल्या एसावाच्या रागाला भिऊन पळून गेलेल्या याकोबाला, अनेक वर्षांनंतर एसाव सामोरे येत आहे पाहून दरदरून घाम फुटला. आपल्या भावाचे बदललेले रूप आणि वागणूक पाहून एसावाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल: तो गर्विष्ठ आणि कारस्थानी पुरुष आता घायाळ होऊन नमलेल्या घोड्यासारखा लंगडत होता. आपण जर याकोबासारखे देवासोबत झगडून त्याची दया आणि आशीर्वाद मिळवला असेल तर साहजिकच आपण तीच दया इतरांनाही बहाल करू. आपण स्वतः न्यायाधीश आणि पंच असल्यासारखे नव्हे तर व्यथित पापी असल्याच्या जाणीवेने निकटच्या एसावांशी वागू.

सेवा आणि अनुसरण करा

याकोब लंगडत एसावाकडे जाणे हा प्रसंग त्यांच्यातील इतिहासच बदलतो. पण बायबलमधील वधस्तंभावरील जखमी येशू ख्रिस्त पाहताना, टर उडवून आनंद मिळवणाऱ्या गर्विष्ठ मनाच्या लोकांची  मजाच संपते. येशू त्याच्या मानवी देहात नम्र होऊन आमच्याकडे आलेला असताना आम्ही आमच्या शेजाऱ्याशी ताठरपणे वागण्याचे धारिष्ट कसे करतो?  जॉन कॅल्विन ख्रिस्ताच्या नम्रतेचे वर्णन करताना म्हणतात, “जशी सुईण नवजात बालकाला कवेत घेते, तसे तो खाली वाकून आम्हांला कवेत घेतो. ख्रिस्ताची ही नम्रता याकोबासारखे लंगडेपण आहे. 

शुभवर्तमानांमध्ये, येशूच्या प्रेमात एक प्रकारचे याकोबासारखे लंगडेपण आहे, कारण “तो सर्वांची आशा धरतो आणि त्याचवेळेस सर्वांसंबंधाने धीर धरतो” (१ करिंथ. १३:७). तो आपल्यासाठी सर्वोत्तमाची आशा बाळगतो, पण त्याच वेळी स्वेच्छेने सर्वात वाईट गोष्टीही सहन करतो. आपल्यापुरते बोलायचे झाल्यास, जेव्हा सर्वांसंबंधाने आशा धरणारी आणि धीर धरणारी ख्रिस्ताच्या सुवार्तेची प्रीती आम्हामधून ओतप्रोत भरून वाहाते, तेव्हाच आपण इतरांच्या स्वभावाचे, व्यक्तिमत्वाचे आणि वागणुकीचे पृथ:करण करू शकतो.

आठवण करू या, येशू सर्वसामान्यांबरोबर, आपल्या शिष्यांसोबत दैनंदिन जीवन जगत होता. त्याने लोकांच्या कुटाळक्या आणि  बेलगाम केलेली टीका ऐकली. दोन प्रसंगी तो आपल्या शिष्यांना कसे योग्य मार्गावर आणतो ते पाहा.

त्याऐवजी इतरांची सेवा करा

पहिले उदाहरण मत्तय २०:२०-२८ मध्ये आढळते, जेव्हा ‘गर्जनेच्या पुत्रांची’ आई (जी स्वतःच एक फटाकडी असली पाहिजे), ती येशूला विनंती करते की, माझ्या दोन मुलांना तुझ्या राज्यात मानाचे स्थान दे. तिची अशी धिटाई पाहून रुसून फुगलेल्या शिष्यांना येशूने आपल्याकडे बोलावून त्यांच्या निदर्शनास आणले की, तुम्ही आता जगातील चढाओढीच्या शर्यतीचे सहभागी नाहीत; त्याच्या विरोधात स्वर्गाचे राज्य दासाचा सन्मान करते. जसा देवाचा पुत्र येशू, “सेवा करून घ्यायला आला नाही, तर सेवा करायला व पुष्कळांच्या खंडणीकरता आपला जीव द्यायला  आला आहे” (मत्तय २०:२८), तसेच तुम्ही व्हावे

येशूने त्यांच्या विचारांना नवे वळण दिले ते असे: जेव्हा मित्रांना कमी लेखण्याचा किंवा त्यांची जागा दाखवण्याचा, त्यांची जिरवण्याचा, किंवा जागच्या जागीच तुमचे दोष दाखवल्यामुळे आपल्या रागाचे समर्थन करण्याचा मोह होतो,  त्याऐवजी सेवा करा. सेवा कशी करावी? ऐकून, वाट पाहून, क्षमा करून आणि जे सर्वोत्तम त्यावर विश्वास ठेवून, कानाडोळा करून, अधिक प्रश्न विचारून आणि समक्ष बोलून सेवा करा. ज्या ख्रिस्ताने वधस्तंभावर मरेपर्यंत जशी सेवा केली, तशी सेवा आपण करू या.

त्याऐवजी येशूच्या मागे जा

येशूने त्यांच्या विचारांना दिलेले दुसरे वळण योहान २१:२०-२३ मध्ये आहे . येशूने पेत्राला त्याच्या पुढील आयुष्यात येणाऱ्या काही कठीण प्रसंगाची आगाऊ कल्पना दिली. पेत्राला जवळच योहान दिसतो, जो येशूच्या विशेष जवळचा आहे, आणि त्याला जाणून घ्यायचे असते की त्याचीही परिस्थिती तितकीच वाईट असेल का. येशूने उत्तर दिले, “मी येईपर्यंत त्याने राहावे, अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तू माझ्या मागे ये” ( योहान २१:२२ ).

जर आपली नजर इतरांच्या मागे भिरभिरत असेल, तर आपण येशूचे अनुसरण करू शकत नाही. शक्यता अशी आहे की, जर आपण आपला बराचसा वेळ आपल्या शेजाऱ्यांच्या त्रासदायक सवयींवर विचार करण्यात आणि त्यांच्या सुखांची तुलना आपल्या सुखांशी करण्यात घालवला, तर आपण देवाला समजू शकत नाही. येशू आपले लक्ष दुसरीकडे वेधतो. जर आपण देवाच्या अनंत सौंदर्याचा अभ्यास केला, तर जेव्हा येशू म्हणेल, “माझ्यामागे या!” तेव्हा आपल्याला कोणी आणि काहीही थांबवू शकणार नाही.

निंदेवर प्रेमाचा विजय

जोपर्यंत जागरूकपणे सुवार्तेच्या शिकवणीच्या ज्ञानात आपण इतर लोकांकडे आणि स्वतःकडे पाहत नाही, तोपर्यंत आपली टीका करण्याची प्रवृत्ती एखाद्या फुग्यासारखी फुगून, आपण मरणासन्न अवस्थेतही दुसऱ्यांच्या चुका काढण्यात पारंगत झालेले असू.  काय भयानक अवस्था! सुवार्ता हे त्यावरचे औषध आहे. आपण आपल्या शेजाऱ्याला आणि स्वतःला घोषित करतो: येशू अपात्र लोकांवर आशेने आणि धीराने प्रीती करतो (१ करिंथ. १३). आपण या प्रियकराच्या मागे युगाच्या अंतापर्यंत जाऊ या. आणि ज्यांची निंदा करणे आपल्याला अधिक पसंत असते, अशा लोकांची सेवा करू या. जग त्या याकोबांकडे थांबून पाहील, जे आता आपल्या बांधवांना लुटत नाहीत, तर लंगडत त्यांना मिठी मारायला जातात.

Previous Article

येशूला कृतघ्नतेची वेदना ठाऊक आहे

You might be interested in …

याला मी अपवाद आहे असे तुम्हाला वाटते का?

 जॉन ब्लूम            आपल्या अनेक पापांचे मूळ कारण आहे: याला मी अपवाद आहे अशी समजूत. म्हणजे जे बहुतेक सर्वांना लागू पडते ते माझ्यासाठी नाही.खाली दिलेल्या काही गोष्टी ओळखीच्या वाटतात ना? मला उशीर झालाय आणि कोणाला […]

वराला भेटण्याची तयारी

जॉन पायपर (बायबलनुसार काळाचा संक्षेप करण्यात आला आहे (१ करिंथ ७:२९). येशूने त्याच्या येण्यासाठी जागृत राहण्यास  सांगितले आहे. का बरे? “कारण तो दिवस किंवा घटका कोणालाही ठाऊक नाही.” ख्रिस्ताचे येणे नजीक येऊन ठेपले आहे आणि […]

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ्

( १७२६-१७९८) लेखांक  १२                            पुढील घटनेचा भारताशी संबंध असल्याने ती येथे नमूद करणे आवश्यक वाटते. प्रशियातील सोनमर्ग गावी १७२६च्या ॲाक्टोबर अखेरीस शेवटच्या घटका मोजत असलेल्या एका तरुणीने आपल्या पतीला व पाळकाला बोलावले. आपले बाळ त्यांच्या […]