Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 19, 2020 in जीवन प्रकाश

पडली, मोठी बाबेल पडली                                                                    पील वॉरन

पडली, मोठी बाबेल पडली पील वॉरन

अगदी नकळत जग बदलले आहे. या पीडेमुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून टाकली आहे. उद्योग आणि व्यापार ठप्प झाले आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तू विकल्या जात आहेत. सर्वव्यापी श्रीमंत जगतात प्राधान्याने चालणारा फावल्या वेळातील कार्यक्रम म्हणजे – शॉपिंग हा आता भूतकाळात जमा झाला आहे. स्टोअर्स बंद आहेत आणि घरोघरी बोलण्यात येणाऱ्या नामांकित ब्रॅंडस चे दिवाळे वाजले आहे. अशी एक वेळ होती की जगातले निरनिराळे खाद्यपदार्थ दररोज रात्री तुम्ही चाखत होता. पण आता सर्व रेस्टॉरंट ओस पडले आहेत. ब्रॉडवे आणि वेस्ट एंडच्या संगीतरात्री रद्द केल्या आहेत. लग्नसमारंभ दिसेनासे झाले आहेत. या सर्वांमध्ये लक्षणीय गोष्ट म्हणजे ज्या वेगाने हे सर्व घडत गेले. जसे काही हे सर्व एका तासाभरात घडले आहे. नेहमीचे जीवन तर आपण नुकतेच जगत होतो आणि आता अशी वेळ आहे की सर्व जग एकत्र रीतीने हे सामान्य जीवन गेले म्हणून आकांत करीत आहे. लोकांच्या ओठी हेच संभाषण आहे. बातम्यांच्या निवेदनाचा हाच विषय आहे.

आता हे ऐकताना तुम्हाला वाटेल की मी करोनाच्या  संकटाविषयी बोलत आहे. पण खरंतर मी प्रकटीकरणच्या  १८व्या अध्यायाचा संक्षेप करून सांगत होतो. येथे योहान जगाचा शेवट पाहत होता. “पडली, मोठी बाबेल पडली” (योहान १८:२). बायबलमध्ये आणि विशेषत: प्रकटीकरणामध्ये सर्वसामान्यपणे बाबेल ही देवविरोधी जगाची प्रतिनिधी आहे. – पापी मानवजात पडली आहे. यामुळे बाबेलचा पाडाव हे जगाच्या अंताचे एक प्रकारचे चिन्ह आहे. प्रकटीकरण१८ हे संस्कृतीचा जवळजवळ ऱ्हास झाल्याचा वृत्तांत सांगते. आता ही काही निवेदने ऐका:

वॉलस्ट्रीट आणि लंडन स्टॉक एक्सचेंज मधून : “पृथ्वीवरील ‘व्यापारी’ तिच्यासाठी ‘रडतात व शोक करतात;’ कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही; सोने, रुपे, मोलवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारची सुगंधी लाकडे, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अति मोलवान लाकडाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे; दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम, व ‘मनुष्यांचे जीव’ हा त्यांचा माल कोणी घेत नाही. “ज्या फळफळावळीची तुझ्या जिवाला चटक लागली आहे, ती तुझ्यापासून गेली आहे; आणि मिष्टान्ने व विलासाचे पदार्थ हे सर्व तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत; ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत!” तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे ‘व्यापारी रडत व शोक करत’ तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील; आणि म्हणतील, “अरेरे! पाहा, ही मोठी नगरी! तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी!” ( प्रकटी १८: ११-१६).

हॉंगकॉंग आणि न्यूयॉर्क सारख्या जगाच्या प्रमुख बंदरातून : “एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली.”
सर्व ‘तांडेल’ गलबतांवरून बंदरोबंदरी जाणारे सर्व, आणि ‘खलाशी व समुद्रावर’ जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर ‘उभे राहिले,’आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करत म्हणाले, “ह्या मोठ्या नगरी‘सारखी कोणती’ नगरी आहे?” ‘त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करत व आक्रोश करत’ म्हटले, अरेरे,‘जिच्या’ धनसंपत्तीने ‘समुद्रातील गलबतांचे सगळे’ मालक ‘श्रीमंत झाले’ ती मोठी नगरी! तिची एका घटकेत ‘राखरांगोळी झाली!’(वचने: १७-१९).

ब्रॉडवे आणि वेस्ट एंड मधून : “वीणा वाजवणारे, ‘गवई’, पावा वाजवणारे व कर्णा वाजवणारे ह्यांचा ‘नाद’ तुझ्यात ‘ह्यापुढे ऐकूच येणार नाही;’ कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणारच नाही; ‘आणि जात्याचा आवाज’ तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही; ‘दिव्याचा उजेड’ तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही; ‘आणि नवरानवरीचा शब्द’ तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे ‘व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक’ होते; आणि सर्व राष्ट्रे ‘तुझ्या चेटकाने’ ठकवली गेली”  (वचने: २२-२३).

अचानक आणि वेगाने झालेले बाबेलचे पतन हे पुन्हा पुन्हा सांगून त्यावर जोर दिला आहे. – “एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.” ८,१०, १७, १९ या वचनांमध्ये पण हेच विधान वारंवार येते.

योहान आपल्या वाचकांना तिच्या नाशाच्या कारणाचा तर्क करायला लावत नाही : “कारण तिच्या ‘पापांची रास स्वर्गापर्यंत पोहचली’ आहे; आणि तिची अनीती देवाने लक्षात घेतली आहे. ‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता”
( वचने: ५,६ ३, ७-८).

याचा अखेरचा परिणाम ८व्या वचनात सांगितला आहे  “ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’ आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव ‘सामर्थ्यवान’ आहे.”

या अध्यायामध्ये योहानाने वर्णन केलेले जगाचे अखेरचे चित्र आणि सध्या चालू असलेली आणीबाणीची परिस्थिती किती समांतर आहे हे स्पष्ट दिसते. आता मी असे म्हणत नाही की सध्याची ही साथ जगाचा शेवट आणणार आहे. (तरी मी असेही म्हणत नाही की ती तो आणू शकत नाही.) पण मी हा निर्देश करतो की आता ह्या वेळी आपण जे पाहत आहोत त्यामुळे आपल्याला शेवटाची आठवण करून द्यायलाच हवी. हे जणू काही होणाऱ्या शेवटाचे आगामी प्रदर्शन आहे. आता सध्या आपण जे जगत आहोत ते जगाच्या शेवटी देव त्याचा जो न्याय ओतणार आहे त्याची एक छोटीशी आवृत्ती आहे. आता सध्याही अनेक प्रकारे बऱ्याच गोष्टी कठीण आहेत. पण अखेरच्या वेळी प्रत्येक प्रकारे त्या भीषण होत जातील.

प्रकटीकरणाच्या पुस्तकातून सर्वत्र आढळणाऱ्या नमुन्याशी हे बरोबर जमते. येथे स्वर्गातून पृथ्वीवर न्याय ओतला जात आहे. तो काही मालिकांमध्ये सात सात वेळा मुक्त केला जातो. सात शिक्के, सात तुताऱ्या, सात वाट्या. न्यायाची प्रत्येक मालिका जगाच्या अधिक मोठ्या भागावर परिणाम करते. शिक्के एक चतुर्थांश भागाला यातना देतात (प्रकटी ६). तुताऱ्या एक तृतीयांश भागाला (प्रकटी ८,९). प्रकटी १०:३-४ मध्ये दिलेले सात गडगडाटाचे न्याय शिक्का मारून बंद केले गेले. नंतर प्रकटी १६ मध्ये देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या सर्व पृथ्वीवर ओतल्या गेल्या.

दुसऱ्या शब्दात आपण शेवटाच्या जवळ येत असताना न्याय वाढत जातो. देव जगाचा न्याय सतत करत आहे (स्तोत्र ७:११, रोम १:१८). पण जसजसे आपण  ख्रिस्ताच्या  येण्याच्या जवळ येत आहोत तसतसे हा न्याय वाढत राहील अशी अपेक्षा आपण करायला हवी. प्रभूने हा मुद्दा मांडताना तो  प्रसुतीच्या वेदनांप्रमाणे आहे असे सांगितले. जसजसा जन्मकाळ जवळ येतो तसतशा  प्रसुतीच्या कळांतले अंतर कमी होते व त्या अधिक जोराने येतात आणि अधिक वेदना देणाऱ्या असतात. जसजसे आपण प्रभूच्या येण्याच्या जवळ येत आहोत तसे त्याचा न्याय ह्या प्रसुतीच्या कळांप्रमाणेच अधिक वारंवार अधिक प्रकर्षाने येणार आणि अधिक वेदनामय असणार.

सध्याच्या ह्या भीषण समस्येत संदेश स्पष्ट आहे: शेवट होणार आहे. मानवी इतिहास हा चक्रातून फिरत नाही. तो लवकर येवो किंवा उशीरा; तो येणार हे निश्चित. आपण कधीही न अनुभवलेली ही जागतिक आपत्ती ही पुढे येणाऱ्या त्या दिवसाचे पूर्वचित्रण आहे. आणि  देवाने त्याच्या दयेने दाखवलेला हा धोका आहे की ज्यामुळे लोकांनी पश्चात्ताप करावा आणि वेळ आहे तोवरच येशूने उद्धार करावा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवावा.