जॉनी एरिक्सन टाडा

लेखांक ३
(लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या वर्षी पोहोण्यासाठी उडी मारताना जॉनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर
नवी कौशल्ये घेऊन व अशा स्थितीमध्ये असलेल्यांना मदत करण्याच्या निर्धाराने ती पुढे आली. १९७९ मध्ये तिने जॉनी अँड फ्रेंड्स ही संस्था स्थापन केली व अशा विशेष गरज असलेल्या कुटुंबांना व मंडळ्यांना ख्रिस्तकेंद्रित कार्यक्रम देऊ लागली. या संस्थेद्वारे अनेक अपंगामध्ये सेवा करणाऱ्या ख्रिस्ती संस्था व विद्यापीठांना शिक्षण दिले जात आहे.)
काळाच्या शेवटाचा असलेला देवाच्या हेतूंचा दृष्टिकोन
प्रारंभीच्या विश्वासीयांना फार मोठा अन्याय अनुभवावा लागला. त्यांच्यावर खोटे आरोप लादून त्यांना सिंहापुढे फेकले गेले. कायदेशीर खटला न चालवता त्यांची घरे, मालमत्ता गिळंकृत केली गेली. त्यांची मुले अमानुषपणे त्यांच्याकडून हिरावून घेतली गेली. त्यांच्यावर आरोप लादून त्यांना तुरुगात डांबण्यात आले, त्यांची थट्टा केली गेली, फटके मारण्यात आले, हद्दपार केले गेले.
तरी प्रेषित पेत्राने त्यांना लिहिले, “वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांनी काही काळापर्यंत तुम्ही दु:खी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहा” (१ पेत्र १:६). प्रेषित पौलाने लिहिले, “आमचे हलकेच संकट जे क्षणमात्र आहे ते आम्हासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गौरवाचा सार्वकालिक भार घडवते” (२ करिंथ ४:१७).
हे आपल्या स्वभावाच्या विरुध्द आहे. योग्य ते मिळावे ही भावना नेहमीच प्रबळ असते. “पुढचं राहू दे, पण आता सर्व योग्य करण्यासाठी देव काय करणार आहे?” आपल्याला झटपट निकाल किंवा योग्य व न्याय्य निर्णय हवा असतो. मी जेव्हा प्रथम विकी ऑलीवसला भेटले तेव्हा तिलाही अगदी असेच वाटत होते. “होय देवा, मी तुझ्यामध्ये आनंद करीन पण जेव्हा माझ्या जीवनाचा विध्वंस करणाऱ्या त्या माणसाला योग्य शिक्षा मिळून तू योग्य न्याय देशील तेव्हाच.” आणि जेव्हा तिचा हातायांचा पक्षघात हा ‘हलका आणि क्षणमात्र’ असल्याचे तिला समजले तेव्हा ती विचार करू लागली, देवा तुझं घड्याळ एकतर माझ्यापेक्षा वेगळं असेल किंवा तुझा शब्दकोश तरी निराळा असला पाहिजे!
पण ‘हलके आणि क्षणमात्र’ यासाठी देव दुसरा शब्दकोश वापरत नाही- जरी देवाची त्यासंबंधी व्याख्या असेल- कापून टाकले जाणे, सिंहाकडून फाडले जाणे किंवा विकीसारखी मानेत गोळी मारणे. देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या लेखकांना शेवटच्या काळाचा दृष्टिकोन होता आणि या योजनेमागे असलेला देवाचा हेतू त्यांना समजला होता. त्यांना ठाऊक होते की…
- दु:ख संकटामुळे देवावर अवलंबून राहणे याचा अर्थ व त्याची गरज आपल्याला समजून येते (२ करिंथ १:९).
- दु:ख संकटे आपल्याला ख्रिस्ताच्या दु:खसहनात सहभागी होण्याचा मार्ग खुला करतात (२ करिन्थ १:५).
- दु:ख संकटे आपल्याला शिकवतात की देवाला आपल्या सुखसोयीपेक्षा आपल्या चारित्र्याबद्दल जास्त कळकळ आहे (रोम ५:३-४).
- दु:ख संकटे आपल्याला शिकवतात की ख्रिस्ती जीवनात सर्वात चांगले म्हणजे दु:खाचा अभाव नसून ख्रिस्तासारखे होणे आहे (रोम ८: २८,२९).
- दु:ख संकटे आपल्याला स्वर्गामध्ये मोलवान पारितोषिके मिळवून देण्याचे साधन आहेत (२ करिंथ ४:१७).
- आपल्या जीवनामध्ये आज्ञापालन घडून येण्यासाठी दु:ख संकटे हे देवाचे निवडक साधन आहे (इब्री ५:८).
- दु;ख संकटे आपल्याला शिकवतात की हे जीवन खरोखर किती अशक्त, सहज मोडणारे, क्षणभंगुर आहे (स्तोत्र ९०:१-१२).
देव चांगल्या गोष्टी कधीही राखून ठेवत नाही
“परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे. देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो” (स्तोत्र ८४:११).
मी व्हीलचेअर वर इतकी वर्षे राहिली आहे नि मला समजले आहे की ‘चांगल्या’विषयी असलेल्या आपल्या कल्पना खरी व्याख्या करण्यास अपुऱ्या पडतात. मग आपण स्तोत्र ८४ कसे वाचावे? जर आपली चालणूक दोषविरहित असेल तर देव आपल्याला शांती देणे रोखून ठेवणार नाही. तो सद्गुण, विश्वास, धैर्य राखून ठेवणार नाही. गरजेच्या वेळी जेव्हा आपण त्याच्याकडे जातो तेव्हा तो कृपा आवरून ठेवणार नाही. आध्यात्मिक दृष्टीने आपण धावू शकू आणि थकून जाणार नाही. आपण विश्वासात चालू आणि पडणार नाही. आपले बी पेरण्यास संधी देण्याचे आणि प्रकाशाचा उजाळा देण्याचे तो थांबवणार नाही. त्याच्या दयेच्या सान्निध्याने आणि गोडव्याने धीर, सहनशक्ती देण्याचे तो राखून ठेवणार नाही. होय कदाचित तो न्याय राखून ठेवील – पण त्याचा अर्थ तुमच्यासाठी नम्रतेचा आत्मा असा असेल. आणि देवासाठी हे चांगले आहे ! होय कदाचित तो सुखसोयी राखून ठेवील- पण तुमच्यासाठी ते विश्वासाचे पारखणे असेल आणि ते देवासाठी चांगले आहे!
स्वर्गीय दृष्टिकोनातून जीवन
ख्रिस्ती लोकांनी या मोडलेल्या पतन झालेल्या जगात तृप्त असावयाचे नाही म्हणूनच येशूने शेवटच्या काळाचा दृष्टिकोन देण्यात कितीतरी शक्ती घालवली. प्रभू स्वर्गातून आलेला होता आणि तो (स्वर्ग) किती अद्भुत आहे हे त्याला माहीत होते. म्हणून तो नेहमी शेवट काय याकडे लक्ष केंद्रित करत असे – पिकाची कापणी, झाडाचे फळ, कामगाराच्या दिवसाची अखेर, गुंतवणुकीचा फायदा आणि वादळात टिकून राहणारे घर. येशूला माहीत होते की जर आपण आपल्या दु:ख संकटात आनंद करणार आहोत तर आता आणि येथले आपले गुंतणे हे खूप कमी व्हायला हवे. मग दु:ख आणि अन्याय सहन करणाऱ्यांना तो कसे म्हणू शकला की:
– शोक करणारे ते धन्य (मत्तय ५:४).
– तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका (रोम १२:१४).
– परीक्षांमध्ये आनंदच माना (याकोब १:२).
– संकटात उल्हास करा (रोम ५:३).
देव जोपर्यंत पाप, दु:ख आणि सैतान यांवर पडदा टाकत नाही, जोपर्यंत राजा देवाचे राज्य पूर्ण करण्यासाठी परत येत नाही आणि सर्वकाळासाठी शांती, न्याय आणि धार्मिकता प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत हे जग आपल्याला निष्फळ आणि निराशाजनक असेल. पण आपण आशा सोडायची नाही. इफिस १:११-१२ आपल्याला सांगते, “आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत. ह्यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.”
विकीचे रूपांतर
या जगाच्या शेवटी इतके काही भव्य घडणार आहे की आपल्या सर्व दु:खाची प्रत्येक अन्यायाची ते भरपाई करील . ह्या दृष्टिकोनाने विकीचा दु:खाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आमची भेट झाल्यावर लवकरच ती आमच्या बायबल अभ्यासाला येऊ लागली. आणि जसजसे तिला देवाच्या वचनात समाधान मिळू लागले तसे तिने स्वत:ची कींव करणे सोडून दिले व त्यामागचा हेतू – गौरवाची आशा असा जो खिस्त तो तिच्यामध्ये- ती पाहू लागली (कलसै १:२७). अखेरीस एक दिवस तिचा पक्षघात हा भूतकाळात जमा होईल हे सत्य समजून तिला समाधान मिळू लागले (१ करिंथ १५).
अखेरीस न्यायाला त्याचा दिवस मिळेल. विकीच्या हल्लेखोराचा न्याय त्याच्या पापाने त्याचा कायमचा नाश करील किंवा ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये सोडवून जीवनात नेईल. जर विकी ऑलीवस आता माझ्या शेजारी असली असती तर तिला गोळी घालणाऱ्याने आपल्या पापांचा पश्चात्ताप करावा आणि त्याला तारण मिळावे अशीच आशा ती करील. हीच विकीची आशा आहे कारण तिला आत्म्याची किंमत – कोणाच्याही आत्म्याची किंमत माहीत आहे – व ती न चालू शकणारे पाय व काम न करू शकणारे हात यापेक्षा खूप भारी आहे. तिला पक्षघात झाला असो व नसो तरी तिला समजते की ती शिक्षा क्रुसावरच्या चोराला मिळालेल्या किंवा अन्यायाने सुटका मिळालेल्या गुन्हेगारापेक्षा चांगली नाही.
विकीला माहीत आहे की, ती नरकाला जाण्याच्या मार्गावर होती आणि ख्रिस्ताने तिच्या पापांसाठी खंडणी भरली. यामध्ये ‘न्याय्य’ असे काहीच नव्हते. आणि जर तिचा हल्लेखोर अखेरीस ख्रिस्ताकडे आला तर देवाच्या दयेची वाखाणणी होईल. तिला यातून समाधान मिळते की या पृथ्वीवर असणाऱ्या तिच्या वेदना याच तिच्या नरकयातना असतील. तिला हे ही समजते की तिच्या हल्लेखोराने जर सुवार्ता नाकारली तर त्याच्यासाठी या पृथ्वीवरच्या यातना त्याला स्वर्गमय वाटतील. म्हणून विकी सतत प्रार्थना करते की ज्याने तिला गोळी झाडली त्याने ख्रिस्ताच्या स्वाधीन व्हावे, क्षमा मिळवावी आणि त्याला स्वर्गात जागा मिळावी – हे सर्व ख्रिस्ताने भरलेल्या किंमतीमुळेच.
ही लक्षणीय वृत्ती आहे! आणि विकीची ही साक्ष सर्वांसाठी देवाच्या कृपेची खात्रीदायक साक्ष झाली आहे. जेव्हा ख्रिस्ती जन तिच्याकडे पाहतात तेव्हा त्यांच्या दु:ख संकटात तसाच विश्वास ठेवण्याचे धैर्य त्यांना मिळते. अविश्वासी तिच्याकडे पाहतात आणि त्यांचा संशय आणि उपहास विरघळू लागतो. कारण ते तिच्याकडे पाहतात आणि विचार करतात तिच्यामध्ये अशा प्रकारचा विश्वासूपणा निर्माण करणारा तिचा देव किती महान असला पाहिजे! मी ही एक हातापायांचा पक्षघात झालेली – तिच्या साक्षीने चकित होते. जेव्हा शेवटचा समय येईल तेव्हा विकीच्या अमोल पारितोषिकाच्या सावलीत मी उभी असेन. नुकतेच मला तिच्याकडून एक उत्तेजनपर चिट्ठी आली तेव्हा मला याची आठवण करून दिली गेली…
“ आपल्या प्रभूचे व्रण असलेले अद्भुत हात स्पर्श करण्यास मी तयार होत आहे. ख्रिस्ताच्या दु:खसहनात मी सहभागी होत आहे हे मला फार समाधान देणारे व उचलून धरणारे आहे. मी मनापासून म्हणू शकते की माझी व्हीलचेअर ही मला देवापासून मिळालेली देणगी आहे. पृथ्वी माझी खोलवरची इच्छा कधीच पूर्ण करू शकणार नाही, फक्त ख्रिस्तच करू शकतो. स्वर्गाकडे जाण्याच्या माझ्या मार्गात येणारे सगळे अडखळे मला फेकून द्यायला हवेत. मला शक्य तितके स्पष्टपणे त्याला सिध्द करून दाखवायचे आहे की मी त्याच्यावर प्रेम करते आणि मी त्याच्याशी विश्वासू राहिले.
जॉनी, आपला प्रवास खडतर झालेला आहे पण या पृथ्वीवर जोपर्यंत आपल्या बरोबर प्रभू आहे तोपर्यंत तो असाच कठीण राहील पण प्रभूसाठी सहन करणे हा किती सन्मान आहे.”
ख्रिस्तामध्ये तुझी बहीण
विकी
दु:खसहनाचे कोडे
हातापायाचा पक्षघात झालेली मी आणि विकी जिवलग मैत्रिणी आहोत – आम्ही आमच्या प्रार्थनेच्या गरजा, उपायांच्या पलीकडे पोचलेले आमचे तणाव आणि आमची ख्रिस्तामधील जिवंत आशा, आम्ही एकमेकींना सांगतो. दडपून टाकणाऱ्या आमच्या परिस्थितीमध्ये देवावर विश्वास टाकण्यास आम्ही एकत्र शिकत आहोत. आणि या सर्वांतून काय ? आम्ही सुज्ञता/शहाणपण मिळवत आहोत.
तुम्ही जिगसॉ पझल सोडवता ना? मला निचेष्ट करणाऱ्या अपघातापूर्वी मी माझ्या जीवनाची जुळवाजुळव करत होते –एका मोठ्या जिगसॉ कोडयाप्रमाणे. मी काळजीपूर्वक शास्त्र वाचायचे आणि प्रत्येक तुकडा – जीवनात बावरून टाकणारी प्रत्येक परिस्थिती – काळजीपूर्वक बसवून जॉनीचे चित्र साकारायचा प्रयत्न करत होते. पण माझा अपघात झाला तव्हा जणू काय मी ज्या टेबलावर माझे चित्र व्यवस्थित रचत होते तो टेबलच देवाने विस्कळीत करून टाकला. माझ्या जीवनाचे तुकडे इतस्तत: विखुरले गेले होते. देवा, आता माझ्या जीवनाचे कोडे मी कसे आणि केव्हा जुळवू शकणार? मी विचारू लागले.
या अनेक वर्षांमध्ये मला समजले की खरे शहाणपण देवाचे मार्ग किंवा त्याच्या योजना व हेतू समजण्यात नाही. तुमच्या जीवनाचे कोडे एकत्र जुळवून त्याचे एक चित्र साकार करण्याची दैवी क्षमता असण्यात नाही. का बरे ते शहाणपण नाही? कारण या भग्न जगामध्ये कोड्याचे अनेक तुकडे तुम्हाला कधी सापडणारच नाहीत. अनंतकाळाच्या पलीकडच्या बाजूला जाऊपर्यंत ते हरवलेलेच राहतील.
खरे शहाणपण म्हणजे कोड्याचा अर्थ लागत नसला – अनेक तुकडे हरवलेले असले – तरी देवावर विश्वास ठेवणे. आमच्या अनेक प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत आणि तुमच्या जीवनाचे चित्र अधुरेच राहते. खरे शहाणपण म्हणजे जीवन जरी अन्यायी वाटले तरी देवावर विश्वास ठेवणे!
बळी की विजयी?
माझ्या अपघातानंतरच्या नजीकचे दिवस मला आठवतात. मी व्हीलचेअरशी तडजोड करीत होते. मला आठवतंय मी म्हणत होते, “एका भयानक अपघाताचा मी बळी झाले असं मला वाटतंय” ही माझी प्रमाणिक भावना होती. पण सत्य हे आहे की देवाची मुले कधीच असा बळी नसतात आणि तसा बळी असल्याचा खेळ पण आपण खेळू शकत नाही.
जेव्हा येशू वधस्तंभावर खिळला गेला तेव्हा आपला बळी दिला जात आहे असे त्याने भासवले नाही. “मी संपलोय” असे न म्हणता त्याने म्हटले “पूर्ण झाले आहे.” योहानाच्या १९वा अध्यायात हे शब्द एका खोल वेदनेतून बोलले गेले असे आपण पाहतो.
प्रभूने बळी झाल्याचा खेळ केला नाही. आणि परिणामी तो विजयी ठरला. एखादी व्यक्ती अपघाताचा किंवा छळवादाच बळी होतच नाही असे मी म्हणत नाही. मी असे म्हणत आहे की तुम्ही स्वत:ला एक गरीब, असहाय्य बळी असे पाहू नका. होय कदाचित कोणी तुम्हाला तुमच्या नोकरीवरून दूर काढत असेल, तुमचा विवाह संकटातून जात असेल. पण येशूद्वारे विजय तुमचा आहे!
Social