Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on दिसम्बर 13, 2022 in जीवन प्रकाश

आपण ख्रिस्तजयंतीच्या भावनांसाठी धडपडतो

आपण ख्रिस्तजयंतीच्या भावनांसाठी धडपडतो

मॅट चँडलर


पुन्हा एकदा या ख्रिस्तजन्मदिनी युद्ध सुरू होणार. नाताळ सुखाचा जावो म्हणायचे की मेरी ख्रिसमस? पण खर्‍या विश्वासीयांसाठी खरे आव्हान यापेक्षा अगदी पूर्ण निराळे असते. ती लढाई आपल्या हृदयासाठी, आपल्या आनंदासाठी आणि आपल्या भक्तीसाठी असते.

मी काही स्थितप्रज्ञ नाही. मला सण साजरा करायला  आवडतो. काही बालिश गोष्टी ज्यांचा सणाशी काही संबंधही नसतो त्या पण आवडतात. पण आपल्याला हे समजायलाच हवे की आपण ह्या जगात चाललेल्या सोहळ्याविरुद्ध आहोत. बहुतेक जाहिराती, टी व्ही वरचे चित्रपट, आणि ख्रिसमससाठी बनवलेले उत्कृष्ट चित्रपट आपल्याला खोटे वास्तव दाखवतात. ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांगतात की आपले सर्व नातलग एक कुटुंब म्हणून आपण एकत्र जमणार आहोत. मेजवानीचा आस्वाद घेत एकमेकांच्या गळी मिठी पडणार आहोत आणि याचा शेवट आपल्या सर्वांच्या शुद्ध आनंदाच्या हास्यामध्ये होणार आहे. वर्षामधील या वेळेला एक भावना असते आणि ही भावना आपल्याला आवडते.

पण जसजसे हा सोहळा आपण साजरा करायला आधीच सुरुवात करतो तेव्हा आपण हे विचारायलाच पाहिजे : या दिवसांमध्ये आपल्याला खरं काय पाहिजे? या दिवसांमध्ये आपण कशावर आशा ठेवायला हवी की त्यामुळे हा सण आनंदाचा होईल? आपण कशाची मनापासून इच्छा करतो की त्यामुळे ख्रिस्तजन्मदिन हा वर्षातला आवडता समय ठरेल? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांना पुढील विधानाने उत्तर दिले जाते : “कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील” (यशया ९:६).

आपली लढाई ही या सर्व जाहिरातबाजीच्या आणि उधळपट्टीच्या खाली  जाऊन येशू ख्रिस्त आपला तारणारा याचा प्रत्यक्ष  अनुभव घेणे- जो आला हे आणि जो परत येणार आहे- त्याच्यासंबंधी आहे.

आपल्या आशेपेक्षा कमी आनंद

ख्रिस्तजन्माच्या खऱ्या अर्थापासून जेव्हा आपण बाजूला होतो, जेव्हा “ जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे (लूक २:१०) त्याच्यापेक्षा वेगळाच आनंद आपण शोधू लागतो, तेव्हा जे कधीच मिळणार नाही त्याची अपेक्षा आपण करतो. का? कारण आपण एका पतित जगात राहत आहोत.

तुमच्यामध्ये काही चुकीचे घडले आहे. माझ्यामध्ये काही चुकीचे घडले आहे. विश्वामध्ये काही चुकीचे घडले आहे. काहीतरी भग्न झाले आहे. देव आणि मानवामधील झालेले या  विच्छेदनामुळे मानवजात भग्न झाली आहे आणि ही भग्नता आपण उभारलेल्या प्रत्येक प्रणालीमध्ये भरून गेली आहे. आपण चालवलेल्या प्रत्येक राज्यव्यवस्थेमध्ये, आपण चालवलेल्या व्यवसायामध्ये आणि आपण वाढवलेल्या कुटुंबामध्ये ती भरून गेली आहे. आपल्याला स्वत:ला वाचवण्यासाठी काहीच शक्ती नाही. या जगात अथवा आपल्या परिवारातील कोणत्याही शक्तीने व शिक्षणाने आपल्याला शांती मिळणार नाही.

 वास्तवापासून  दडून न बसता वरील सत्यच ख्रिस्तजन्माचा खरा अर्थ अतुलनीय करते. ख्रिस्तजन्माचा आनंद, ख्रिस्तजन्माची आशा म्हणजे प्रीतीने दिला गेलेला तो बाळ (योहान ३:१६). ज्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील”  (यशया ९:६). जे शोक करत आहेत आणि रस्ता चुकलेले आहेत त्यांच्यासाठी तो अद्भुत मंत्री – मसलत देणारा. समर्थ देव – त्याच्या लोकांना त्यांच्या भूत, वर्तमान आणि भविष्यकालच्या पापापासून सोडवणारा समर्थ पिता- या पित्याच्या काळजी घेण्याचेच  अनुकरण येशूने आपल्या लोकांसाठी केले. आपला शांतीचा अधिपती  जो सर्व युद्धे थांबवील. आणि जे कोणतीही राज्ययंत्रणा, करार,  किंवा राष्ट्राध्यक्ष साध्य करू शकले नाहीत ते तो देऊ करील : खुद्द देवासमवेत शांती.

या वर्षीच्या सोहळ्यामध्ये नाताळाच्या जल्लोषात ख्रिस्ताचे सार न गमावता आपण ह्या भग्न जगाला जी आनंदाची सुवार्ता दिली त्याकडे गांभीर्याने मनन केले पाहिजे. “वर्षामधल्या या सर्वात अद्भुत वेळामध्ये” आपल्या भग्नतेचा विचार करणे ही आपल्या ज्ञानाविरूद्धची गोष्ट वाटेल. पण रोषणाई, ख्रिस्तमस ट्री , डेकोरेशन यामध्येच गुंतून न जाता आपण पापाच्या वास्तवाची आठवण करायला हवी त्यामुळे आपल्याला तारणार्‍याची गरज का आहे हे आपण आठवू शकू. अंधारामध्ये राहत असताना स्वर्गातून जगात प्रकाश आला त्यामुळे आपण नवल करू.


आपल्या अपेक्षा शुद्ध करा

म्हणून आपल्या सोहळ्यामध्ये ख्रिस्त राखण्यासाठी आपण प्रथम वाईट बातमीवर विचार करायला पाहिजे ज्यामुळे चांगली बातमी आपल्याला अद्भुत वाटेल. पण आपल्याला इथेच थांबायचे नाही. आपण आपल्या अपेक्षा उभारायला हव्यात.

आपल्या विस्तृत समाजामध्ये सुद्धा हा सोहळा अपेक्षांवरच उभारला गेला आहे. काही दिवसांमध्ये  तुम्ही बाहेर  दिव्यांच्या माळा लावाल, ख्रिसमस ट्री बाहेर काढाल, त्यावर चित्रे, वस्तू टांगाल  आणि बक्षिसे वेष्टणात गुंडाळून ठेवाल. हे सर्व त्या ख्रिस्तजन्मदिनाची वाट पाहात. पण आपला विश्वास आहे की ज्या देवाने येशू विजय मिळवून आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी प्रथम येणार आहे असे वचन दिले त्याच देवाने म्हटले येशू आपल्या लोकांना घरी नेण्यासाठी परत येणार आहे. आपण पहिला ख्रिस्तजन्मदिन साजरा करतो कारण त्याचे दुसरे येणे होणार आहे.

पहिल्या आगमनामध्ये येशू आपल्या राज्याचे उदघाटन करण्यासाठी  बालक म्हणून गोठयामध्ये आला. जेव्हा ख्रिस्त त्याच्या दुसऱ्या आगमनात परत येईल तेव्हा त्या राज्याची तो पूर्तता करील. ख्रिस्त हा ज्याला लपेटून ठेवावे लागते  तसा बालक म्हणून येणार नाही तर ज्याच्या मांडीवर राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू असे कोरलेले आहे व ज्याच्या ‘तोंडातून तीक्ष्ण धारेची’ तलवार निघते; असा मानव येणार आहे (प्रकटी . १९:१५-१६).

आपला तारणारा जिवंत व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी, सर्व काही नवे करण्यासाठी परत येत आहे. जेव्हा ख्रिस्त परत येईल तेव्हा तो ह्रदये आणि अखेरीस सर्व जगाचेच रूपांतर करून टाकणार आहे.

जे काही भग्न झाले आहे ते तो कायमचे पूर्णपणे नवे करील. जे भरलेले उदर पुढे गव्हाणीमध्ये भरून गेले व पुढे ज्याची कबर रिकामी झाली त्याने आपल्याला महान आनंदाने भरून टाकायला हवे; त्याचे एकच साधे कारण : तो परत येणार आहे. देवाने सांगितले होते तो येईल आणि तो आला. त्याने सांगितले त्याच्या लोकांसाठी तो आपला प्राण देणार आहे (योहान १०:१४-१८) आणि त्याने तसे केले. त्याने सांगितले मी परत येणार आहे आणि तो येईल (योहान १४:१-३). आपण ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा करतो कारण आपल्याला ठाऊक आहे की एक दिवस आपण त्याच्यासमवेत समोरासमोर उत्सव करणार आहोत.

या सोहळ्याच्या वर्षी व्यावसायिक आणि उपभोगवादाच्या ह्या वेगवान प्रवाहामध्ये, खरेदी, प्रवास आणि मेळावे यांच्या घाईगर्दीत आपण नांगर रोवायला हवा. आणि हा नांगर म्हणजे त्याच्या जन्मावर मनन करण्याचा सराव. हा पारंपारिक मोसम आपल्याला  आपल्या भग्न ह्रदयावर आणि या जगाच्या भग्नतेवर  विचार करायला पाचारण करतो. आणि मग त्या दिवसाकडे पाहायला लावतो जेव्हा त्याच्या पुन्हा येण्याने ही सर्व भग्नता संपूर्ण नष्ट होईल

ही ख्रिस्तजन्माची वास्तव (आणि मार्मिक) लढाई आहे. ही काही राजकीयदृष्ट्या योग्य असण्याची वाद्स्पर्धा नाही. ह्या सोहळ्याचा पुरा फायदा घेण्यासाठी लक्षकेंद्रित करून मन:पूर्वक केलेला हा प्रयत्न आहे. रोषणाई आणि बक्षिसे यात वाहवत न जाता, नाताळाच्या भावनांना बळी न पडता आपण ह्या बालकाचा खरा आनंद घेण्याचे शिकत आहोत.