अप्रैल 7, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जेव्हा प्रत्येक आशा नाहीशी होते

वनिता रिस्नर

पुनरुत्थानदिन मला खूप आवडतो. तो आनंदाचा सर्वोच्च दिवस आहे. आपण उत्साहात सामील होऊन म्हणतो, “प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे!”

पण जेव्हा मी उत्तम शुक्रवारचा विचार करते, तेव्हा माझे मन खिन्न होते. ती एका सर्वोच्च निराशेच्या  दिवसाची आठवण आहे, जेव्हा पापाने जगाला बुडवून टाकले  होते आणि दुष्टाईचा वरचष्मा झाल्यासारखे वाटत होते.

काही वर्षांपूर्वी, मी एका खोल नैराश्यात बुडत होते. आयुष्य निस्तेज झाले होते. मी अगदी क्षुल्लक कारणावरून रडायचे, आणि कधीकधी कोणत्याही कारणाशिवाय. मी एका काळ्या गर्तेत पडत होते, आणि माझे पडणे थांबवण्यासाठी माझ्यात शक्तीच उरली नव्हती.

माझ्या आयुष्यातील खूप काही विस्कळीत झाले होते. माझ्या पतीने आमच्या कुटुंबाला सोडून दिले होते, आणि आमच्या मुलांनी ठरवले होते की देव अस्तित्वात नाही. ते रागावलेले आणि गोंधळलेले होते, आणि त्यांचा राग ते घरात काढत होते. माझे आरोग्य खालावत चालले होते. दोन किशोरवयीन मुलांची काळजी घेणे तर दूरच, मला स्वतःची काळजी घेणेही कठीण जात होते.

मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यावर होते. पूर्वी माझा देवाशी घनिष्ठ संबंध होता, पण आता देव माझ्यावर प्रेम करतो यावर विश्वास ठेवण्यासाठी मला संघर्ष करावा लागत होता. माझ्या सततच्या वेदनांनी मला खात्री पटवून दिली होती की माझी परिस्थिती कधीही बदलणार नाही. थोडक्यात, मला खूप निराश वाटत होते.

माझ्या मैत्रिणींनी मला जेवण आणून, माझ्यासोबत प्रार्थना करून आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देऊन शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न केला.

मी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले, पण तरीही मला भारावून गेल्यासारखे आणि निराश वाटत होते. मला माझ्या समस्यांबद्दल बोलायला आवडत नव्हते कारण कोणीही माझ्या वेदना समजू शकत नव्हते. प्रियजनांनी सल्ला दिला, पण मी तो स्वीकारूही शकत नव्हते.

जेव्हा स्वप्ने मरतात

एके सकाळी मी अखेरीस काही मैत्रिणींना माझ्या भावना काय आहेत हे सांगण्याचा निर्णय घेतला. मला बोलायचे नव्हते, पण मला माहीत होते की संतांकडून प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे आहे. माझ्या सततच्या दुःखात मला सहभागितेपासून आणखी दूर जायचे नव्हते.

पण आम्ही बोलायला सुरुवात केल्यावर, मी पुढे बोलूच शकले नाही. मी तिथे फक्त रडत बसले होते. त्यामुळे मला मूर्ख वाटत होते. मैत्रिणींचा दिलासा जरी चांगल्या हेतूने दिलेला असला तरी, पोकळ वाटत होता. कोणीही हे ठीक करू शकत नव्हते. देवसुद्धा हे करू शकेल की नाही, असा प्रश्न मला पडू लागला होता.

मी हुंदके देत असताना, माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत एक अक्षर न बोलता शांतपणे बसल्या होत्या.

दीर्घ शांततेनंतर, एक मैत्रीण बोलली. तिचे शब्द मी कधीही विसरणार नाही. जेव्हा मी तुझ्याबद्दल विचार करतो आणि तुझ्यासाठी प्रार्थना करते, तेव्हा माझ्यापुढे हे चित्र येते.  येशूचे शिष्य आणि त्याची आई मरीया, वधस्तंभाच्या पायथ्याशी रडत असल्याचे चित्र. ते एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत एकत्र जमले आहेत. जे काही घडले आहे, त्याचा अर्थ लावण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण त्याचा काहीच अर्थ लागत नाही.

आकाश काळे झाले आहे. सर्व आशा मावळल्यासारखे वाटत आहे. त्यांची स्वप्ने भंग पावली आहेत. यातून काहीही चांगले निष्पन्न होणार नाही असे त्यांना वाटते. त्यांच्यासाठी, हा दिवस, उत्तम शुक्रवार, त्यांनी अनुभवलेला सर्वात अंधकारमय दिवस आहे.
पण एक गोष्ट जी त्यांना माहीत नाही ती म्हणजे… पुनरुत्थानदिन येत आहे.

देवाची योजना अजून पूर्ण झालेली नाही

पुनरुत्थानदिन येत आहे.

मला ते शब्द नीट समजून घेणेही कठीण जात होते.माझ्या सख्यांच्या इतर कोणत्याही शब्दांनी मला सांत्वन दिले नव्हते. आता मी एका अवर्णनीय शांतीने भरून गेले होते.
अर्थातच. पुनरुत्थानदिन येत आहे.

मी रडायची थांबले. येशूचे अनुयायी जेव्हा वधस्तंभाच्या पायथ्याशी उभे होते, तेव्हा त्यांच्या जागी मी स्वतःला कधीच ठेवले नव्हते. बायबल फक्त  इतकेच म्हणते, “तेव्हा सैनिकांनी या गोष्टी केल्या, पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, तिच्या बहिणी, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या” (योहान १९:२४-२५).

 उत्तम शुक्रवारच्या दिवशी येशूच्या मित्रांना कसे वाटले असेल, याची मी यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती. त्याच्या शिष्यांनी, ज्यांनी आपला विश्वास आणि आशा येशूवर ठेवली होती, ते आता त्याला मरताना पाहत होते.  जेव्हा मी शिष्यांना आणि मरीयेला कसे वाटले असेल याची कल्पना करू लागले, तेव्हा मला त्यांच्याशी एक नाते जोडल्याचे जाणवले. निराश होण्याची भावना काय असते हे त्यांना माहीत होते. त्यांची स्वप्ने भंग पावली होती. त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले होते. त्यांच्या योजना नष्ट झाल्या होत्या. आधार घेण्यासाठी काहीही उरले नव्हते.

त्या क्षणी ते चित्राचा फक्त तोच भाग पाहू शकत होते, जो  ते त्यावेळी जगत होते. त्यांच्याकडे फक्त तेवढेच होते.

त्यांच्याप्रमाणेच, माझ्या परिस्थितीमधून देव काहीतरी चांगले कसे घडवून आणेल हे मला दिसत नव्हते. पण जेव्हा मी उत्तम शुक्रवारचे हे चित्र माझ्या मनावर ओढन घेतले, तेव्हा माझ्या लक्षात आले की माझी कहाणी अजून संपलेली नाही. देवाची योजना अजून पूर्ण झालेली नाही. सर्व आशा नष्ट झाली नव्हती.

राखेतून सौंदर्य

माझ्या सख्यांच्या शब्दांनी मला तेव्हा आणि आताही अवर्णनीय सांत्वन दिले. मी अनेक वर्षांपासून त्या वचनाला, वधस्तंभाजवळील त्या दृश्याला धरून राहिले आहे. त्याने मला धैर्य दिले. त्याने माझ्या जीवनाला एक योग्य दृष्टिकोन दिला आहे. त्याने मला आठवण करून दिली की देव राखेतून सौंदर्य निर्माण करतो.

माझ्या लक्षात आले की माझे दुःख तात्पुरते होते; एके दिवशी ते संपेल. माझ्या दुःखाला अर्थ होता; ते वाया जाणार नव्हते. माझे दुःख देवाचे गौरव करू शकत होते; ते शेवटी माझ्या भल्यासाठीच असेल.

तो अनुभव अनेक वर्षांपूर्वीचा असला तरी, मी तो दिवस कधीही विसरणार नाही. त्याने मला आशा दिली. असे नाही की माझ्या परिस्थितीत रातोरात बदल झाला. पण बदल शक्य होता. आणि तो एके दिवशी नक्कीच येईल.

त्याने मला याचीही आठवण करून दिली की मी अनेकदा फक्त एका क्षणचित्राकडे, माझ्या आयुष्याच्या चित्रपटातील एका चौकडीकडे पाहत असते. पुढे काय येणार आहे याची मला काहीच कल्पना नसते. कदाचित माझ्या रडण्याची रात्र संपली आहे आणि पहाट होणार आहे. तो क्षण येईल आणि तो आपल्यासोबत अवर्णनीय आनंदाचा पूर घेऊन येईल.

किंवा कदाचित माझे अश्रू अजून थांबलेले नाहीत. कदाचित रात्र आणखी काही काळ टिकेल.

पण एक गोष्ट मला नक्की माहीत आहे:  पुनरुत्थानदिन येत आहे.

Previous Article

उत्तरांशिवाय आज्ञाधारकता

You might be interested in …

आध्यात्मिक धोक्यांबद्दल जागरूक असा

जॉन ब्लूम जागरूक न राहणे हे आपल्या जिवांसाठी नाशकारक आहे.  हा नाश रूपकात्मक अथवा आभासी किंवा काव्यात्मक नाही – तर खराखुरा नाश आहे. आपण ख्रिस्तामागे चालत असताना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागणार हे प्रेषित पौलाला […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १२  दानिएलाचे सत्तर सप्तकांचे भाकीत –  दानीएल ९:२४-२७. हे भाकित बायबलच्या बहुतेक भाकितांचा कणा आहे. येशूने मत्तय २४:१५ मध्ये केलेले, २ थेस्स. २ मधील पौलाने केलेले, योहानाने प्रकटी ११-१३ अध्यायांमध्ये […]

 विल्यम केरी

(१७६१- १८३४) लेखांक १४                                        आतापर्यंत आपण जर्मन व डॅनिश मिशनरी पाहिले. डॅनिश मिशनचा अस्त झाल्यावर इंग्लंडने भारतात जे मिशनरी पाठवले, त्यातील हा पहिला मिशनरी. १६०० मध्ये भारतात ब्रिटिश कंपनी आली. व्यापारात उत्तम जम बसूनही भारतात […]