Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अगस्त 30, 2022 in जीवन प्रकाश

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

 संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक २

येशू हा देवाच्या योजनेचे केंद्रस्थान आहे. येशू हाच अंतिम राजा व त्याचे राज्य हा जुन्या करारातील भाकि‍तांचा विषय आहे. त्याच्याद्वारे देवाची योजना, अभिवचने, भाकिते व करार प्रत्यक्ष पूर्ण होतात. येशू जुना करार नष्ट करायला आला नव्हता (मत्तय ५:१७-१८). उलट त्यातील भाकिते प्रत्यक्ष पूर्ण होण्याविषयी तो निर्वाळा देतो (मतय २४ व २५). ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानी पाहण्याविषयी व यहुदावर येणार्‍या प्रसंगाविषयी दानिएलातून संदर्भ देतो. तर यशयातून आकाशातील चिन्हाविषयी  संदर्भ (यशया १३:१०) देऊन हे प्रत्यक्ष घडण्याविषयी स्पष्ट सांगतो. दानिएल ७:१३ नुसार मनुष्याचा पुत्र मेघातून उतरेल हे येशू सांगतो. याबाबतच्या भाकि‍तांचा तो तपशील देतो. पौल व पेत्राच्या  लिखाणातून ‘प्रभूचा दिवस’; ‘ अनीतिमान पुरुष’ अशा शब्दप्रयोगांनी देव पुढील घटनाचे व ख्रिस्तविरोध्याचे तपशील देतो (१ थेस्स. २:३-४; ५:२; २ पेत्र ३:१०). रोम ११:२६-२७ मध्ये इस्राएल राष्ट्राच्या पुनरुध्दाराचे वर्णन केले आहे. संपूर्ण नवा करार हा जुना करार कसा पूर्ण होणार ते स्पष्ट करतो. येशू व बाप्तिस्मा करणारा योहान दोघेही देवाचे राज्य जवळ आल्याची घोषणा करतात.

पण येशूला अखेरपर्यंत प्रचंड विरोध झाला. त्यांच्या नगरांनी त्याला धिक्कारले (मत्तय ११:२०-२४); त्याच्यावर धर्मपुढार्‍यांनी गलिच्छ आरोप केले. मग मात्र येशू त्याच्यावर विश्वास ठेवणार्‍यांनाच रहस्ये सांगू लागला तर लोकांशी फक्त दाखल्यांनी बोलू लागला. लूक १९:११-२७ मध्ये तो त्याची दोन आगमने सांगतो. कारण पहिल्या आगमनानंतर त्याला स्वर्गात जाणे आवश्यक होते (योहान १६:७). बायबलची भाकिते समजायला ही दोन आगमने लक्षात घेणे गरजेचे आहे. काही भाकिते त्याच्या पहिल्या आगमनाने पूर्ण झाली ( प्रे.कृ ३:१८). तेथे येशू दु:खसहन करणारा सेवक दाखवला आहे. ती वधस्तंभावर जाण्याविषयीची भाकिते आहेत. दुसर्‍या आगमनाची भाकिते आता पूर्ण होणार आहेत (प्रे.कृ. ३: २०,२१). दानीएल मधील ७०वा आठवडा, इस्राएलांचे तारण, ख्रिस्तविरोधी, एक हजार वर्षांचे राज्य अशा काही घटनांचा त्यात समावेश आहे.

आपण येथे वैयक्तिक पातळीवरील भावी काळाविषयी मग वैश्विक भावी काळाविषयी पाहणार आहोत.

(अ) वैयक्तिक स्तरावरील भावी काळ – या अभ्यासात मानवाचे मरण, मधली अवस्था, पुनरुत्थान, नरक, स्वर्ग यावर प्रकाश पडेल.                                                   

 (१) मरण – मरण हा कोणाच्याही आवडीचा विषय नाही. पण बायबलप्रमाणे मरण हे मानवाचे भवितव्य आहेच. मरणाच्या वास्तवतेविषयी लोकामध्ये कितीही अज्ञान असले तरी फक्त बायबलच मरणाचा उगम, त्याचे महत्त्व आणि त्याचा पराभव होण्यासाठी काय घडणे आवश्यक आहे त्याविषयी सांगते. मरण म्हणजे अस्तित्व नसणे नव्हे. मरण या शब्दाचा मूळ अर्थ आहे: ‘विभक्त होणे’ किंवा ‘ताटातूट होणे.’ उत्पत्ती ३५:१८ मध्ये आपण असे शब्द वाचतो की ‘राहेलचा प्राण जाता जाता’ म्हणजे मृत्यूच्या वेळी तिचा प्राण तिच्या देहापासून विभक्त होत होता.  

बायबल तीन प्रकारच्या मरणाविषयी बोलते.

(अ) शारीरिक मरण – यावेळी शरीर पूर्णपणे थांबते. विराम पावते. म्हणजे मेंदू, र्‍हदय यांसारख्या प्रमुख अवयवांचे काम पूर्ण बंद होते. आणि त्या व्यक्तीचे शरीर जिवात्म्यापासून विभक्त होते. शरीर आत्म्यावाचून निर्जीव होते (याकोब २:२६). त्यामुळे माती (शरीर) पूर्ववत मातीस मिळते व देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जातो (उपदेशक १२:७).

(ब) आत्मिक मरण – मनुष्य शरीराने जिवंत असतानाही आत्म्याने मृत असू शकतो. प्रत्येक व्यक्ती गर्भरूपात असल्यापासून ते जन्मानंतरही आत्मिक मृतावस्थेत असते (स्तोत्र ५१:५). याचे कारण  आदामाचे पाप व आपल्या पूर्वजांचा स्वभाव अनुवंशिक रीतीने आपल्यामध्ये आलेले असतात. इफिस २:१ मध्ये आपले वर्णन केले आहे की, “तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामध्ये मृत होता.” हे ख्रिस्तासमोरील आपल्या तारणापूर्वीच्या अवस्थेचे चित्र आहे. येथे दाखवून दिले आहे की इफिसकर पूर्वी शरीराने जिवंत असले तरी आत्म्याने ते देवापासून विभक्त होते.

(क) सार्वकालिक मरण – देवापासून कायमचे दूर विभक्त होऊन राहण्याच्या शिक्षेचे हे सार्वकालिक जगणे आहे. जे आयुष्यभर पश्चात्ताप न करता आत्मिक मृत अवस्थेतच जीवन जगून मरण पावतात, त्यांच्यासाठी देवाच्या सान्निध्यापासूनच्या ताटातुटीचा हा अनुभव असणार आहे (२ थेस्स १:९). ते आपले भवितव्य तेथेच कंठणार आहेत (प्रकटी २१:८). सर्वच लोक हा अनुभव घेणार नाहीत. तर तारणासाठी येशूवर विश्वास ठेवणारे यातून वाचतील.

मरणाविषयी आणखी शिकवण

(१) निर्माणकर्त्या देवाची आज्ञा मोडण्याचे पाप केल्याने आदामापासून हे मरण ओढवले आहे (रोम ५:१२). मरणाचे परिणाम दूरगामी व अत्यंत विध्वंसक आहेत.

(२) मरण हे वास्तव आहे. भ्रम नव्हे. ते प्रत्यक्षात आत्म्याचे शरीरापासून विभक्त होणे आहे.

(३) मानवाचे मरण हा देवाच्या निर्मितीचा भाग नव्हता (उत्पत्ती अध्याय १ व २ ). अश्रू गाळणे व रडणे ही मरणाशी निगडीत आहेत. मरण म्हणजे जीवनाला व्यत्यय किंवा अडखळण आहे. त्याचा मोहही होऊ नये किंवा त्यामुळे निराशही होऊ नये. या पतीत जगात आपल्याला सर्वत्र मरण नजरेसमोर घडताना दिसत असल्याने आपण ती नैसर्गिक गोष्ट समजतो. पण देवाने माणसाला मरण्यासाठी मुळीच निर्माण केले नव्हते. एक दिवस मरणाचा पराजय होणार आहे. नवे आकाश व नव्या पृथ्वीवर मरणाची उपस्थितीच नसणार (प्रकटी २१:४). या विश्वात मरणाची घुसखोरी झाली आहे. या शत्रूवर विजय मिळवायलाच हवा. १ करिंथ १५:२६ मध्ये घोषित केले आहे की, “जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.” तर प्रकटी २०:१४ म्हणते की, “मरण अग्नीसरोवरात टाकले जाईल.” येशूमुळे अखेर मरण पराजित होणार आहे. म्हणून विश्वासी व्यक्तीने आनंदाचा गजर करीत म्हटले पाहिजे, “मरण विजयात गिळले गेले आहे. अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?”(१ करिंथ १५:५४,५५)

(४) या युगात मरण कोणालाही चुकवता येत नाही, हे सत्य आहे. ते प्रत्येकाला थेट त्या  निर्माणकर्त्यासमोर जीवनाचा हिशेब देण्यासाठी नेऊन उभे करते. इब्री ९:२७ म्हणते की “माणसाला एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे.” मरण थेट शांत निरामय अस्तित्वाची किवा निर्वाणाची हमी देत नाही, की सर्वांचेच मरणानंतर स्वर्गात वास्तव्य होणार असेही नाही. अविश्वासीयांसाठी  मरण भयजनक आहे. ते सतत जवळच असल्याने माणसाने पश्चात्तापास  उद्युक्त व्हायलाच हवे. ते अनपेक्षितपणे येत असल्याने एखादा मूर्ख कसा देवासमोर जाईल ते लूक १२:२० मध्ये आपण वाचतो.

(५) एका अस्तित्वातून मरण पुढच्या स्थित्यंतरात नेते. या अस्तित्वापासून अस्तित्व नसण्यात ते रूपांतरित होत नाही. विश्वासीयांचे स्थित्यंतर जेथे  देव वसतो त्या स्वर्गात, पुनरुत्थित येशू व देवदूतांच्या सान्निध्यात होते. अविश्वासीयांचे स्थित्यंतर अधोलोकात तात्पुरत्या शिक्षेसाठी होते (लूक १६:१९:३१). याविषयीचा तपशील आपण पुढे पाहू.      

                                                             प्रश्नावली

सूचना:- वरील विवेचन वाचून त्यावरून खालील प्रश्नावली सोडवा. आवश्यक तेथे उत्तरासाठी संदर्भ दिले आहेत.                                               

प्रश्न १ ला :- पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.                                                   

१ – मरणाच्या तीन प्रकारांची नावे सांगा                                                   
२- मानवात पाप कसे आलेले असते? ( स्तोत्र ५१:५)                                      
३- सार्वकालिक मरणाची शिक्षा कोणासाठी आहे? त्या मरणाचे स्वरूप काय? (२ थेस्स. १:९; प्रकटी २०:१४-१५)                                                                     
४- आत्मिक मरण म्हणजे काय? ते केव्हा सुरू होते व केव्हा संपते? (इफिस २:१,२,५)        
५- येशूची दोन आगमने कोणती? पहिल्या आगमनात मुख्यत: काय झाले? ( प्रे कृ ३:१८ )


प्रश्न २ रा – पुढील घटनांचा १ ते १२  क्रम लावा.

अ – विश्वासीयांवर पवित्र आत्मा पाठवला ——                                          
ब – मशीहाने बदलीचे हिंसक मरण सोसले——                                             
क- सैतान व अविश्वासीयांचा न्याय करून देव त्यांना अग्निसरोवरात टाकणार —–                    
ड – येशू पृथ्वीवर 1000 वर्षे राज्य करणार ——                                            
इ – राजा स्वर्गात गेला—–                                                             
ई – पवित्र आत्म्याच्या आगमनापासून मंडळीची बांधणी चालू आहे—–                                 
उ – मशीहाच्या स्वकीयांनी त्याला धिक्कारले ——                                             
ऊ – नवे आकाश व नवी पृथ्वी बनवणार, तेथे सर्वकाळ आपण राज्य करणार  ——                                                  ए – देवाने मशीहाच्या राज्याविषयी अब्राहामाशी करार केला ——-.                                  
ऐ – देव भावी काळी पृथ्वीवर क्रोध ओतणार मग येशू स्वत: पृथ्वीवर उतरणार ——                            
ओ – वधस्तंभावर मरण पावल्यावर पुनरुत्थानाने पाप्याचा देवपित्याशी समेट घडवून आणला ——                  औ – करारानंतर काही शतकांनी ठरणारा राजा त्याच्या स्वकीयांकडे आला. ——


प्रश्न ३रा  – कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा
.

(दूरगामी व विध्वंसक; बंद; रडणे व अश्रू गाळणे; आत्मा; मृत्यू; निरामय; विराम; स्वर्गात; मातीस; निर्वाणाची; जिवात्म्यापासून ; हिशोब; मेंदू व ह्रदय ; देव व देवदूत,  निर्जीव; अधोलोकात)                                            

१. मरणानंतर आपण देवासमोर ——-देण्यासाठी उभे राहतो.
२. मरणात शरीर पूर्णपणे थांबून —-पावते. तेव्हा ———- या प्रमुख अवयवांचे काम पूर्ण —- पडते. शरीर ———विभक्त होते. शरीर आत्म्यावाचून ——– बनते व ते पूर्ववत —– मिळते. आणि देवाने दिलेला ——- देवाकडे जातो.     
३. मरणाचे परिणाम ——— आहेत.
४. ——– ही मरणाशी निगडित आहेत.
५. शेवटचा शत्रू —–होय. मरण शांत ——– अस्तित्वाची किंवा ——– हमी देत नाही.
६. सर्वच लोक मरणानंतर ——-जातील असे नाही
७. मरणांनंतर विश्वासीयांचे स्थित्यंतर स्वर्गात —————यांच्या सान्निध्यात होते.
८. अविश्वासीयांचे स्थित्यंतर मरणांनंतर ———– तात्पुरत्या शिक्षेसाठी होते.                   

प्रश्न ४ था :-  चूक की बरोबर सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.                          

१. मानव पापी आहे म्हणून पाप करतो. ———- स्तोत्र ५१:५                                                
२. देव अचानक घटना घडवतो ————-यशया ४६:८-१०                                                  
३. येशू जुना करार नष्ट करायला आला होता ———-मत्तय ५:१७-१८                                          
४. येशू स्वर्गातून गरुडावरून उतरेल——–दनिएल ७:१३                                       
५. जुन्या कराराचे स्पष्टीकरण नवा करार देतो ——-                                             
६. येशू व योहान दोघेही देवाचे राज्य भावी काळी येणार अशी घोषणा करत होते. —–मत्तय ३:२; ४:१७                                                                                      ७. येशू लोकांशी दाखल्यांनी बोलू लागला तर विश्वासीयांना रहस्ये शिकवू लागला —–मत्तय१३:१०-११                                                                                 ८. मनुष्य गर्भात असता व त्यानंतरही आत्मिक दृष्ट्या मृत असतो ——-इफिस २:१                          
९. माणूस मरणांनंतर अनेक योनींतून जातो.———इब्री. ९:२७                                           
१०. मानवाचे मरण हा देवाच्या निर्मितीचा भाग नव्हता  ——–उत्पत्ती अध्याय १ व २