Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on नवम्बर 9, 2021 in जीवन प्रकाश

येशूचा सर्वात वादग्रस्त दावा

येशूचा सर्वात वादग्रस्त दावा

डेविड मॅथीस

                  

आपल्या या दिवसामध्ये अधिक प्रक्षोभक ठरणारा येशूचा सर्वात वादग्रस्त दावा आहे: “ मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्यावाचून पित्याजवळ कोणीही येत नाही” (योहान १४:६). आजच्या  सर्वसमावेशक  काळामध्ये हे शब्द संघर्षाला सुरुवात करणारे वाटतात. पण सध्याच्या मतभेदांमध्ये आपण त्यांचा अर्थ गमावला आहे काय?
ज्यांना ह्यावर अधिक संशोधन करायला हवे त्यांना हे पाहून आश्चर्य वाटेल की हा दावा सार्वजनिक ठिकाणी किंवा धार्मिक प्रतिस्पर्ध्यांना तोंड देताना वापरलेला नाही. तर हा येशूचे निकटचे मित्र एकत्र जमलेले असताना खाजगी रीतीने केलेला आहे.

गोंधळामध्ये दिलासा

त्याचे शिष्य घाबरलेले आहेत, त्यांची  भीती वाढतच आहे. त्यांच्यातला एक शिष्य नुकताच धोकेबाज म्हणून बाहेर गेला आहे (योहान १३:२१-३१). आणि येशूने नुकतेच सांगितले आहे की तो पण त्यांना आता कायमचा सोडून जात आहे (योहान १३:३३). आता तो सांगत आहे की त्यांचा प्रमुख जो पेत्र तो त्याला तीन वेळा नाकारणार आहे (योहान १३:३८). या गोंधळात व शिरकाव करणाऱ्या भीतीमध्ये येशू योहान १४:१-४ मध्ये  सांत्वनाचे शब्द बोलत आहे. या सर्व वचनांवर फडकते निशाण म्हणजे वचन १: “तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये.” येशू जो मार्ग आहे तो प्रथम अनुयायांना दिलासा शांती आणि खात्री देत आहे. हे शब्द संघर्षाचे नसून जिवाला शांत करणारे, ह्रदयाला सत्य भरवणारे आहेत. प्रथम सांत्वन  आहे – वादविवाद नाही.

येशू त्याच्या शिष्यांना अस्वस्थतेमधून भरवसा ठेवण्याकडे नेत आहे.  “तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये.”  हे नकारात्मक वाक्य आहे. आता होकारात्मक : “देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.” अस्वस्थतेला, काळजीला, भीतीला  तो कोणता  प्रतिबंधक उपाय सांगत आहे? विश्वास.
आणि येशूवर विश्वास ठेवणे हा आजही भीतीवरचा मोठा प्रतिबंधक उपाय आहे. पण हा सर्वसामान्य भरवसा नाही. आपल्याला विश्वास ठेवण्यास विशिष्ट बाब हवी आहे – ती तो पुरवतो. हे निरनिराळ्या प्रकारे आपण पाहू शकू पण येथे चार गोष्टी आपण पाहू या.

१. देवाला एक मोठे घर आहे – आणि मोठे हृदय आहे.
योहान १६:७ मध्ये त्याने पुन्हा म्हटले, “मी जाणे हे तुमच्या हिताचे आहे.”  पण प्रथम तो पित्याच्या तरतुदीचा विस्तृतपणा वर्णन करतो. त्याचे घर लहान नाही. “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले नसते. मी तुम्हांसाठी जागा तयार करावयास जातो” (योहान १४:२).

देवाच्या घरात थोडीशी नाही पण विस्तृत जागा आहे – हे पित्याच्या ह्रदयाशिवाय होऊ शकत नाही. ही तर त्याच्या ह्रदयातून येणारी अभिव्यक्ती आहे. त्याच्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, हे तो कोण आहे याबद्दल सांगते. सध्याच्या त्रासामध्येही  त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो.

२. येशू तुम्हाला तेथे नेईल.
येशूला आता अधिक तपशील आणि विशिष्ट अभिवचने द्यायची आहेत.

“ मी तुम्हांसाठी जागा तर करायला जातो आणि मी जाऊन जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन; यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे” (योहान १४:३-४).
देवाच्या निवडलेल्या जनांसाठी पित्याचे ह्रदय आणि जागाच फक्त नाही तर खुद्द येशू स्वत: परत येईल आणि त्यांना आपल्याजवळ घेईल. शिष्यांनी स्वत: देवाजवळ येण्याची वाट पाहत तो बसणार नाही; तो परत येईल त्यांना घेईल आणि स्वत:जवळ आणेल. पण अजून बरेच काही आहे.

३. येशू स्वत: तेथे असणार.

या परिच्छेदातले मला अतिशय गोड वाटणारे शब्द आहेत : माझ्याजवळ. “आणि मी जेव्हा परत येईन तेव्हा तुम्हांला माझ्याजवळ घेईन. त्रस्त शिष्यांसाठी हे खूप समाधानाचे शब्द आहेत. येशू त्यांना फक्त स्वर्गात नेणारच नाही तर तो स्वत: तेथे असणार. आणि त्या जागेचे मूलतत्त्व म्हणजे त्याच्याशी सहवास – “यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे”
येथे आपण जागेकडून व्यक्तीकडे दिशा बदललेली पाहतो. येशू फक्त स्वर्गाकडे, त्याच्या पित्याच्या घराकडे निघालेला नाही, तर शिष्यांना तेथे घेऊन जायला तो स्वत: येणार. एवढेच नाही तर शिष्यांसाठी स्वर्ग म्हणजे येशूला जाणून घेणे आणि त्याच्या सहवासाचा आनंद लुटणे. तो तेथे आपल्याबरोबर असणार.

४. येशूने तुमच्यासाठी जागा तयार केली आहे

येशूने दोनदा म्हटले की, “मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो” (योहान १४:२,३). त्याच्या लोकांसाठी तो जागा तयार करतो याचा अर्थ काय? स्वर्ग अस्ताव्यस्त, गोंधळात आहे की काय? स्वर्गामध्ये पडझड झालेली आहे की काय आणि येशू त्याचे नूतनीकरण करणार की काय?
या परिच्छेदामध्ये एक दुसरा “मार्ग” आहे. तो आपल्यासाठी नाही तर फक्त येशूसाठी आहे. आणि तो न बदलणारा आणि एकमेव येशूचाच आहे. माडीवरच्या खोलीनंतर तो जेथे जाणार आहे. तो मार्ग स्वर्गाकडे नसून त्याच्या मृत्यूकडे आहे. “मी जेथे जातो” (योहान १४:४) तो वधस्तंभाचा रस्ता आहे. हा मार्ग येशूने (आमच्यासाठी)  घेतल्याशिवाय आम्हाला दुसरा कोणता मार्गच नाही (पित्याकडे जाण्याचा).

जागा तयार करणे म्हणजे स्वर्गाचे नूतनीकरण नाही तर या जगामध्ये वधस्तंभी जाणे.

येशू हा पुरेसा आहे

तर येशू हा “एकच मार्ग” आहे हे कबूल करण्यात आपल्याला कोणते समाधान मिळते? ज्या सत्यासाठी आपल्याला अनेकदा झगडण्यास सांगितले आहे त्याद्वारे येशूमध्ये आपल्याला कोणती जवळीकता लाभते?
योहान १४ व्या अध्यायात येशू त्याच्या गोंधळलेल्या शिष्यांशी बोलत आहे. त्यांच्या अनिश्चिततेमध्ये, त्यांच्या काळजीमध्ये, भीतीमध्ये तो बोलत आहे. आणि त्यांचे सांत्वन करताना तो जे म्हणतो त्याचा मथितार्थ, “मी तुमच्यासाठी पुरेसा आहे.” तुम्हाला रस्ता ठाऊक आहेच कारण तुम्ही मला ओळखता. मीच मार्ग आहे. मी तुम्हाला पुरेसा आहे.   तुम्हाला इतरत्र कुठेच पाहण्याची गरज नाही. माझ्यासोबत  अजून काही तुम्ही जोडावे याची गरज नाही.

तुम्ही विचलित झाला आहात आणि मीच मार्ग आहे.
तुम्ही गोंधळला आहात आणि मीच सत्य आहे.
तुम्ही भीतीने गांगरून गेला आहात आणि मीच जीवन आहे.
मला जाणून घेणे हे पुरेसे आहे आणि पुरेसेच असणार. तुमचा शोध माझ्यामध्येच संपेल.

त्याचा गौरव आपला आनंद

एकच मार्ग (एक मार्ग नव्हे), एकच सत्य ( फक्त खरे नव्हे), एकच जीवन (केवळ जीवन नव्हे) असण्यामध्ये येशूला गौरव मिळतो. आणि जेव्हा त्याला गौरव मिळतो तेव्हा आपल्याला असा प्रभू , तारणारा व अमोल ठेवा मिळाल्यामुळे आनंद, शांती, आणि स्थिरता मिळते. हा एकच मार्ग म्हणजे काही तत्त्वांवर विश्वास ठेवून, ठराविक कृतीने त्यांचे पालन करणे नव्हे तर एका जिवंत व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याला आपली ठेव मानणे. ख्रिस्तीत्वाचा गाभा म्हणजे काही नियमांचे पालन नसून एका व्यक्तीची ओळख करून घेत राहणे व त्याचा आनंद घेणे होय.

येशू हा एकमेव मार्ग आहे. या सत्यासाठी काहीही झाले तरी झगडत राहा – तुमच्या वर्गात, मित्रांसोबत कॉफी घेताना, रस्त्यावर . पण तुमच्या अंतरी खोलवर त्याचा गोडवा गमावू नका.